चेन्नई शहर पाण्याखाली!
: मुसळधार पावसाने वाताहत
चेन्नई : तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. चेन्नई आणि उपनगरांत रात्रभर कोसळलेल्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच दोन धरणांमधून पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे अधिकाऱ्यांनी रविवारी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळं रविवारी चेन्नईतील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नई शहराला पाणीपुरवठा करणारे चेम्बरमबक्कम आणि पुझल तलाव मुसळधार पावसामुळं ओसंडून वाहत आहेत.
प्रशासनानं चेन्नईतील नागरिकांना पुराचा इशारा दिला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी कांचीपुरम आणि तिरुवल्लूर या भागांतील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये 2015 नंतर इतका मुसळधार पाऊस पहिल्यांदाच पडतोय. चेन्नई, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांतील अनेक उपनगरांमध्ये शनिवारी सकाळपासून अधूनमधून पाऊस पडला आणि रात्रभर सुरु राहिल्यानं अनेक भागांत पूर आला, त्यामुळे लोकांची गैरसोय झाली.
चेन्नईतील कोरातूर, पेरांबूर, पोरूर, पूनमल्ले, कोडंबक्कम, अण्णा सलाई, टी नगर, अडयार, पेरुंगुडी आणि ओएमआर या भागांतही पावसामुळे पाणी साचले आहे. यामुळे चेन्नईत वास्तव्याला असणाऱ्या अनेकांनी पावसाचं रौद्ररुप दाखवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. .
रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत चेन्नईत 207 मिमी पाऊस झाला होता. नुंगमबक्कममध्ये 145 मिमी, विलिवक्कममध्ये 162 मिमी आणि पुझलमध्ये 111 मिमी पाऊस झाला. चेन्नई आणि लगतच्या भागांत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, तिरुवल्लूर जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी 11 वाजता पुझल जलाशयातून 500 क्युसेक पाणी सोडण्याची घोषणा केली आहे. तलावालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.
महाराष्ट्रातही अनेक भागांत अवकाळी पाऊस
पावसाळा संपला तोच पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं चित्र महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. प्रामुख्याने उत्तर आणि दक्षिण गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुढील पाच दिवस मच्छिमारांना देखील समुद्रात न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.
COMMENTS