Chapekar Memorial | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण

HomeBreaking News

Chapekar Memorial | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण

Ganesh Kumar Mule Apr 18, 2025 7:37 PM

Katraj-Kondhwa Road Pune |  कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामांसाठी अजित पवार २०० कोटी मिळवून देणार का? | अजित पवारांनी पाहणीच्या वेळी दिले आश्वासन 
Parner : Ajit Pawar : मुळा धरणातून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार
Bhaiyyasaheb Jadhav | Gopichand Padalkar | पडळकरांच्या अप्रगल्भ वक्तव्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही | राष्ट्रवादी प्रवक्ते भैयासाहेब जाधव

Chapekar Memorial| मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण

 

Devendra Fadnavis – (The Karbhari News Service)  – ‘हुतात्मांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळत असते. चापेकर बंधु अशाच हुतात्मांपैकी एक होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांचे कार्य चापेकर स्मारकाच्या माध्यमातून नागरिकांसमोर येणार असून हे केंद्र खऱ्या अर्थाने युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे ठरेल. हे स्मारक उभारताना तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तमरित्या वापर करण्यात आला असून ते केवळ पिंपरी चिंचवडसाठी मर्य़ादित न राहता महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे ठरेल,’ असे प्रतिपाद महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Pimpari Chichwad News)

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण व राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, प्रशांत बंब, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, अमर साबळे, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, क्रांतीवीर चापेकर यांचे वंशज प्रशांत चापेकर, प्रतिभा चापेकर, स्मिता चापेकर, चेतन चापेकर, मानसी चापेकर, जान्हवी जोशी यांची विशेष उपस्थिती होती. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते चापेकरांच्या वंशांजाचा सन्मान यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमास स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे वंशज चंद्रकांत खोमणे नाईक, अमोल खोमणे नाईक, विशाल खोमणे नाईक, हुतात्मा राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू यांचीही प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘चापेकर वाडा येथे उभारण्यात येत असलेले स्मारक अतिशय सुंदर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या स्मारकात चापेकर बंधू यांच्या जीवनाशी संबंधित एकूण १४ प्रसंग आहेत.’ चापेकर बंधूनी केलेल्या रँडच्या वधाबद्दल सविस्तर माहितीही यावेळी त्यांनी दिली.

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा चापेकर बंधूनी घेतली होती. चापेकर वाडा येथे उभारण्यात आलेले स्मारक हे लवकरच राष्ट्रीय स्मारक होणार आहे. भारताचा सूवर्णमय इतिहास या स्मारकात पाहण्यास मिळेल, या स्मारकात दृकश्राव्य माध्यमातून त्या काळातील प्रसंग आपल्याला समजून घेता येतो असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

चापेकर स्मारकाचे भुमिपूजन आणि आज स्मारकाचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली त्यामुळे मी स्वतःला फार भाग्यवान समजतो, क्रांतिवीर चाफेकर स्मारक समितीच्या वतीने चालविण्यात येत असलेले येथील समरसता गुरुकुलम संस्थेस भेट देण्याची संधी मला मिळाली या संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य उत्तम असून, आपण समाजातील वंचित समाजाला समरसतेतून संस्कारी कसे करू शकतो याचे आदर्श व उत्तम उदाहरण संस्थेत पहावयास मिळते. या संस्थेचे कार्य पुढे येण्यासाठी जागेची कमतरता भासणार नाही. जागा उपलब्ध करून दिली जाईल या चांगल्या उपक्रमासाठी,शासन या संस्थेस मदत करेल अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे बांधकाम अतिशय अप्रतिम केले आहे. या वाड्याच्या पुनर्बांधणीमुळे देशभक्तीचा नवा हुंकार पेटला आहे. क्रांतीवीर चापेकर स्मारकाच्या उद्घाटनाचा हा क्षण देशभरातील जनतेसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असून ब्रिटीश सरकारच्या अन्यायाविरोधात केलेल्या एल्गाराची आठवण आहे. समाजसुधारकांच्या आणि क्रांतिकारकांच्या सेवा, त्याग समर्पणातून आपला देश घडला आहे. त्यांच्यामुळे मिळालेले स्वातंत्र्य अखंड राखणे, संविधानिक मूल्यांचे संरक्षण करणे, विविधतेमध्ये असलेली एकता जपणे, हे आपले कर्तव्य आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व महाराष्ट्राने नेहमीच केलेले आहे. तसेच आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या चापेकर बंधु, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे बलिदान आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य, समानता या संविधानिक मूल्यांची जपवणूक करून ती मूल्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे,’ असेही ते म्हणाले.

चापेकर बंधूचे स्मारक म्हणजे गौरवशाली इतिहासाशी भावनिक नाते जोडणारं केंद्र

चापेकर स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश असणारी चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. यामध्ये क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्या त्याग आणि बलिदानाबद्दल तसेच स्मारकाबद्दल माहिती होती. शुभेच्छा संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, ‘क्रांतीवीर चापेकर बंधूंचा इतिहास हा आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या तेजस्वी आणि प्रेरणादायी अध्यायांपैकी एक आहे. त्यांनी दाखवलेली राष्ट्रभक्ती, अपार साहस आणि बलिदान यामुळे देशप्रेमाला नव्या अर्थाने समृद्धी दिली. त्यांच्या स्मृतीस समर्पित हे राष्ट्रीय संग्रहालय केवळ एक स्मारक नाही, तर ते आपल्या गौरवशाली इतिहासाशी भावनिक नाते जोडणारं केंद्र आहे. हा उपक्रम आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा अभिमान बाळगण्यास प्रेरणा देतो आणि ‘विकसित भारत’ या आपल्या सामूहिक संकल्पाची आठवण सतत जागवतो.’

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रास्ताविक करताना चापेकर स्मारकाची माहिती दिली. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी क्रांतीवीर चापेकर स्मारक उभारण्याचा प्रवास तसेच गुरुकुलम बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरजा जोशी यांनी केले तर आभार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मानले. हा संपूर्ण कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनतर्फे तेजा पटवारी यांनी सांकेतिक भाषेत अनुवादीत केला. कार्यक्रमाला या परिसरातील नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्रांतीवीर चापेकर वाडा येथील स्मारकास भेट

मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड गावातील क्रांतीवीर चापेकर वाडा येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकास भेट देऊन पाहणी केली. क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी यावेळी स्मारकाविषयी माहिती दिली. श्री. फडणवीस यांच्या हस्ते क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर समरसता गुरुकुलम संस्थेसही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट दिली गुरुकुलम संस्थेत सुरु असलेल्या विविध उपक्रमाविषयी व गुरुकुलमच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली. तसेच संस्थेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी मान्यवर उपस्थित होते.