Chandani Chowk Pune | चांदणी चौक पादचारी मार्ग आणि मेट्रो प्रकल्पाची सविस्तर पाहणी; नागरी सुविधांसाठी लिफ्टची मागणी | दिलीप वेडेपाटील
Dilip Vede Patil – (The Karbhari News Service) – चांदणी चौक परिसरातील पादचारी मार्ग व चांदणी चौक ते कोथरूड (कचरा डेपो) मेट्रो प्रकल्पाच्या (Pune Metro) प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज विशेष पाहणी बैठक पार पडली. माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील (Dilip Vede Patil) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पाहणीमध्ये मेट्रो प्रकल्पाचे नागरी जीवनावर होणारे परिणाम, पादचारी मार्गाच्या सोयीसुविधा, तसेच वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. (Pune News)
चांदणी चौक हा पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण ठिकाण असून येथे मेट्रो स्थानक निर्माण झाल्यास, नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीचा आणि जलद होईल. यासोबतच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवीन लिफ्टसह आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यावरही भर देण्यात आला. नगरसेवक दिलीप आण्णा वेडेपाटील यांनी या लिफ्टची तातडीने आवश्यकता असल्याचे मांडले. त्यांनी सांगितले की, “लिफ्ट सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व लहान मुलांना प्रवासात अधिक सोय होईल, तसेच नागरिकांची सुरक्षितता अधिकाधिक सुनिश्चित होईल.”
या पाहणीत प्रकल्प अधिकारी कार्यकारी अभियंता संदीप पाटील रोहिदास गव्हाणे भवन विभाग,संग्राम पाटील इंजिनियर नॅशनल हायवे प्राधिकरणाचे अधिकारी, पुणे महामेट्रोचे श्री. रेड्डी साहेब व त्यांची टीम यांच्यासह सर्व संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते. पाहणीदरम्यान, मेट्रो स्थानकाची अचूक जागा आणि त्याचा वाहतूक व्यवस्थेवर होणारा परिणाम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी मेट्रो प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवास जलद होईल, तसेच पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळेल असे सांगितले. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरी जीवनाचा दर्जा उंचावेल, तसेच आर्थिक व सामाजिक विकासाला गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
चांदणी चौक परिसरातील पादचारी मार्ग हा नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा भाग असून, या मार्गावर लिफ्टसारख्या अत्याधुनिक सुविधा निर्माण झाल्यास नागरिकांचा प्रवास सुलभ होईल. या प्रकल्पाच्या वेळेत अंमलबजावणीसाठी आणि नागरी सुविधांमध्ये कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना नगरसेवक दिलीप आण्णा वेडेपाटील यांनी केली.
मेट्रो प्रकल्प आणि पादचारी मार्गाच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच या प्रकल्पामुळे चांदणी चौक परिसरात एक नवा अध्याय सुरू होईल आणि पुणेकरांना अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.
COMMENTS