BJP Pune Delegation लोकसभा निवडणुकीच्या मतदार याद्यांतील दोष दूर करा! |भाजपा शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Pune Voter List – (The Karbhari News Service) – लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी असल्याने पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात असंख्य मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या मतदार याद्यांतील दोष दूर कराव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्ष पुणे शहरच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे केली. तसेच, मतदार प्रारुप याद्या देखील लवकरात लवकर प्रसिद्ध कराव्यात अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीतील सदोष मतदार याद्यांसंदर्भात भाजपा शिष्टमंडळाची पुणे जिल्हा निवडणूक प्रमुख तथा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. या बैठकीत शिष्टमंडळाने मतदार याद्यांमधील त्रुटींकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आ. माधुरीताई मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्या सह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीलाच नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधून ४६९०० नावे वगळण्यात आली. त्यासोबतच नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण एक लाखापेक्षा जास्त मतदारांची नावे मतदार याद्यांमधून वगळण्यात असल्याने, मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागल्याचा मुद्दा जिल्हाधिकारी दिवसे यांच्यासमोर प्रकर्षाने मांडला. त्यासोबतच आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे पुरेशा जनजागृतीच्या अभावामुळे ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ही मतदान करता आले नाही, आदी मुद्द्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
आ. माधुरीताई मिसाळ यांनी मतदान केंद्रांवर संथ गतीने मतदान प्रक्रिया राबविण्यात आल्याने; मतदारांना अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागल्याची बाब मांडली. तर, आ. योगेश टिळेकर यांनी मतदारांना मतदान केंद्रांची माहिती वेळेत न मिळाल्याने अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागल्याचे सांगितले. याशिवाय सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर यांनीही मतदार याद्यांमधील त्रुटी आणि मतदान केंद्रांवरील अडचणींकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
सदर सर्व त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, जेणेकरून आगामी विधानसभा निवडणूक चांगली होईल व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल, अशी यावेळी शिष्टमंडळाने अपेक्षा व्यक्त केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, २ ऑगस्ट रोजी मतदार प्रारुप याद्या जाहीर करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ज्यांची नावे वगळली गेली आहेत त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाला आश्वास्त केले.