Abasaheb Garware College : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा

HomeBreaking Newsपुणे

Abasaheb Garware College : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा

Ganesh Kumar Mule Feb 14, 2022 4:49 PM

Bhondala | Bal Vikas Mandir | बाल विकास मंदिर शाळेत भोंडल्याचे आयोजन
School First Day | बाल विकास मंदिर शाळेत नवागतांचे स्वागत
Atharvashirsha Pathan | सासवड येथे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा

पुणे : कर्वे रस्त्यावरील म.ए.सो.च्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. म.ए.सो. अंतर्गत स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळालेले हे दुसरे महाविद्यालय आहे अशी माहिती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट श्री. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी आज (सोमवार, दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी) पत्रकार परिषदेत दिली. संस्थेचे सचिव प्रा. डॉ. भरत व्हनकटे, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. बी. बुचडे यावेळी उपस्थित होते.

शिक्षणाचे माहेर घर म्हणून पुण्याची ओळख ही अनेक शैक्षणिक संस्थांमुळे आहे. यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मोठे योगदान आहे. १८६० मध्ये आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, श्री. वामन प्रभाकर भावे आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी स्थापन केलेली पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन नंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (MES) म्हणून ओळखली जाऊ लागली. सन १८९६ मध्ये संस्थेने महाराष्ट्र कॉलेज सुरू केले होते. या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी स्वातंत्र्याच्या मागणीसाठी विद्रोही भाषणे केल्याने हे महाविद्यालय इंग्रज सरकारच्या रोषाला पात्र ठरले आणि त्यानंतर बंद पडले. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात पदार्पण करताना एम.ई.एस. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स १९४५ साली सुरू करण्यात आले, जणू हा महाराष्ट्र कॉलेजचा पुनर्जन्मच! हेच कॉलेज आज मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. हे महाविद्यालय महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राष्ट्रीय विचारांशी व चारित्र्यवान नागरिक आणि सशक्त राष्ट्र निर्माण करण्याच्या मूल्यांशी सुसंगत आहे. गेली १६१ वर्ष ‘मएसो’चे कार्य याची साक्ष देते, या मध्ये मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाने गेली ७५ वर्षे योगदान दिले आहे. मागील वर्षी हे महाविद्यालयाचे हीरक महोत्सवी वर्ष होते.

१९४५ साली स्थापन झालेल्या मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये आता २५ पदवीधर शिक्षण विभाग आहेत ज्यामध्ये १८ पदव्युत्तर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त विज्ञान आणि कला विद्याशाखेतील ०७ संशोधन केंद्रे आहेत. महाविद्यालयात ५० पेक्षा जास्त अभ्यासक्रम शिकवले जातात.
महाविद्यालयाला तीन वेळा NAAC द्वारे प्रमाणित करण्यात आले आहे. चालू वर्षात वरिष्ठ महाविद्यालयातील सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात अद्ययावत वर्ग आणि प्रयोगशाळा आहेत. महाविद्यालयात ग्रंथालय आणि क्रीडाविषयक पायाभूत सुविधाही उपलब्ध आहेत. महाविद्यालयात अनेक विद्यार्थीकेंद्रित उपक्रमही राबवले जातात. मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय मूल्ये रुजवणे, त्यांना राष्ट्रीय विकासात योगदान देण्यास सक्षम बनवणे, त्यांच्यामध्ये जागतिक दर्जाची क्षमता विकसित करणे, त्यांना सामाजिकदृष्ट्या जबाबदार नागरिक बनवण्यासाठी कार्य करत असते.
ऑगस्ट २०२० मध्ये महाविद्यालयाने स्वायत्त दर्जा मिळवण्याचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सादर केला होता. कोविडच्या परिस्थितीमुळे सप्टेंबर २०२१ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाला भेट दिली. प्रत्यक्ष पाहणीनंतर, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा देण्याची शिफारस केली.

नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन स्वायत्ततेत कौशल्य आधारित शिक्षणावर भर देणारे अभ्यासक्रम सुरू करण्याची महाविद्यालयाची इच्छा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पारंपारिक अभ्यासक्रमांद्वारे ज्ञान मिळू शकेल तसेच त्यांची रोजगारक्षमताही वाढेल. स्वायत्ततेअंतर्गत, भविष्यात व्यापक संधी असणारे अभ्यासक्रम सुरू करण्याचा महाविद्यालयाचा प्रस्ताव आहे. डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच नॅनोसायन्सेस आणि नॅनोटेक्नॉलॉजी यासारख्या विषयांमध्ये नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. नवीन स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज आणि सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स सुरू करण्याचीही महाविद्यालयाची इच्छा आहे. चांगले नेते आणि प्रशासक विकसित करण्यासाठी आणि जागतिक समस्यांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून हे अभ्यासक्रम विकसित करण्याची योजना आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0