Antyodaya Sharmik Suraksha Yojana | अंत्योदय श्रमिक सुरक्षा योजना (ASSY) काय आहे ! जाणून घ्या फायदे
Antyodaya Sharmik Suraksha Yojana | आपल्या देशाच्या विकासामध्ये असलेले श्रमिकांचे मोठे योगदान ओळखून, त्यांची आर्थिक स्थिरता आणि कल्याण यासाठी भारत सरकारनेश्रम व रोजगार मंत्रालय आणि भारतीय टपाल विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यांच्या समन्वयाने आपल्या देशातील श्रमिकांसाठी “अंत्योदय श्रमिक सुरक्षा दुर्घटना योजना” (ASSY)लागू केली आहे. दूरदर्शी असलेली ही योजना देशातील श्रमिकांना अत्यल्प किमतीमध्ये उपलब्ध होत असून ती अपघात विमा सुरक्षेचे संरक्षण देते.
अंत्योदय श्रमिक सुरक्षा योजनेचा प्रायोगिक शुभारंभ 8 जुलै 2023 रोजी गुजरातच्या नडियाद, खेडा जिल्ह्यात करण्यात आला.
अंत्योदय श्रमिक सुरक्षा योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
1. सर्वसमावेशक विमा सुरक्षा: यामध्ये रु 10 लाख आणि रु. 5 लाख अपघाती विम्यासह श्रमिकांच्या अनन्य गरजा पूर्ण करण्यासाठी अपंगत्व लाभ, हॉस्पिटलायझेशन लाभ इ. फायद्यांचा समावेश आहे.
2. अत्यल्प प्रीमियम: सर्व स्तरातील श्रमिकांसाठी 10 लाखाचा विमा केवळ वार्षिक 499/- रु. प्रीमियम दराने आणि 5 लाखांचा विमा केवळ वार्षिक 289/- रु प्रिमियम दराने अशा अतिशय सवलतीच्या दराने उपलब्ध करून देण्यात आला आहे.
3. सुलभ नावनोंदणी प्रक्रिया: श्रमिक जवळच्या पोस्ट ऑफिस/पोस्टमन/ग्रामीण डाक सेवक यांच्यामार्फत अतिशय सहजपणे या विम्याची नोंदणी करू शकतात.
4. संपूर्ण भारतभर कव्हरेज: गुजरात मध्ये या योजनेला यश मिळाल्यामुळे आता ही योजना संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली असून कोणतेही श्रमिक याचा लाभ घेऊ शकतात.
पुणे टपाल क्षेत्रामधील अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिस मध्ये ही योजना उपलब्धआहे. दिनांक 20 फेब्रुवारी पासून या योजनेसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
वरील चारही जिल्ह्यातील श्रमिक जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा आपल्या पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवकांशी संपर्क साधून या विम्याची नोंदणी करू शकतात. सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती पुणे क्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी केली आहे.