Anantrao Pawar College | अनंतराव पवार महाविद्यालयात आंतरवासिता (इंटर्नशिप) व ‘ऑन-द-जॉब ट्रेनिंग’ कार्यशाळा संपन्न

HomePune

Anantrao Pawar College | अनंतराव पवार महाविद्यालयात आंतरवासिता (इंटर्नशिप) व ‘ऑन-द-जॉब ट्रेनिंग’ कार्यशाळा संपन्न

Ganesh Kumar Mule Jul 14, 2025 10:42 PM

Anantrao Pawar College : अनंतराव पवार महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
International Yoga Day 2024 | अनंतराव पवार महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा
Anantrao Pawar College | अनंतराव पवार महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळा संपन्न

Anantrao Pawar College | अनंतराव पवार महाविद्यालयात आंतरवासिता (इंटर्नशिप) व ‘ऑन-द-जॉब ट्रेनिंग’ कार्यशाळा संपन्न

 

PDEA – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमधील कौशल्यविकास तसेच विद्यार्थ्यांच्या करिअर विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत ‘आंतरवासिता (इंटर्नशिप) व ऑन-द-जॉब ट्रेनिंग’ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. (Pune News)

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. योगीराज देवकर (एमसीएडीचे निवृत्त संचालक), मा. श्री. आशिष नेमाडे (नेमाडे प्रा.लि.) उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर विविध कंपन्यांचे मानव संसाधन व्यवस्थापक (HR), यशस्वी उद्योजक, समन्वयक डॉ. प्रकाश पांगारे उपस्थित होते.

कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून विद्यापीठ गीताने झाली. कार्यशाळेच्या उद्देशाबाबत बोलताना प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी संस्थेच्या ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याला अनुसरून महाविद्यालय विद्यार्थ्यांना नोकरी आणि उद्योजक निर्माण करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. पुढे त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असलेले आंतरविद्याशाखीय शिक्षणाचे महत्त्व सांगून आंतरवासीतेची (इंटर्नशिप) अनिवार्यता अधोरेखित केली.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मा. श्री. योगीराज देवकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यावर भर दिला. ते म्हणाले की, “संशोधनानुसार १५% लोक उद्योजक होऊ शकतात; पण सध्या केवळ २% लोकच उद्योजक आहेत. उर्वरित १३% विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.” पुढे त्यांनी आपल्या यशस्वी जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांची उदाहरणे देऊन वेळेचा सदुपयोग व्यक्तिमत्त्व विकासासाठी कसा करता येतो हे स्वानुभवातून सांगितले. त्यांनी Intrapreneurship व Entrepreneurship यातील फरक स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी, उद्योगासाठी आपल्यातील पात्रता आणि कौशल्ये विकसित करणे गरजेचे असल्याचे मत मांडले.

मा. श्री. आशिष नेमाडे म्हणाले की, विद्यार्थ्यांची सर्व कौशल्ये मुलाखतीमध्ये दिसून येत नाहीत, ते इंटर्नशिपच्या माध्यमातून साधता येणार आहेत. त्यांनी जगामध्ये असणारी स्पर्धा सांगून आपण आपले निश्चित उद्दिष्ट ठेवण्याविषयी स्पष्ट केले. नोकरीसाठी कौशल्ये आणि भाषा महत्त्वाची ठरते. भाषेवरील प्रभूत्व महत्त्वाचे असल्याचे सांगताना वेळेचे व्यवस्थापनही महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पुढे ते म्हणाले की, आमच्याकडे व्हरायटी ऑफ जॉब आहे आणि महाविद्यालयाकडे व्हरायटी ऑफ मॅन आहेत त्यामुळे आपल्या दोघांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांसह कंपन्यांचा देखील मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

कार्यशाळेसाठी विविध कंपन्यांचे व शैक्षणिक संस्थांचे मानव संसाधन व्यवस्थापक उपस्थित होते. श्री. वैभव गोरे, श्री. किशोर जाधव, श्री. पुष्पक शहा, श्री. शिवाजी पाटील, श्री. पांडुरंग पवार, श्री. संतोष जाधव, नियाज शेख, छाया डोक, ज्योती दहीभाते, प्रियंका पवार, कविता पवार आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आपल्या कंपनीत उपलब्ध संधींची माहिती दिली.

कार्यशाळेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा. अॅड. संदीप कदम, खजिनदार मा. अॅड. मोहनराव देशमुख, सहसचिव मा. श्री. एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) मा. श्री. ए. एम. जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले.

प्रा. भरत कानगुडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
सूत्रसंचालन डॉ. विजय बालघरे व डॉ. नम्रता अल्हाट यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. प्रकाश पांगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेच्या संपन्नतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.