संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान
आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या सोमवारी (ता. २०) दुपारी अडीचला देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
राज्याच्या कानाकोपऱ्यांतून हजारो भाविक देहूत दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी देहूनगरीतील ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. पालखीमार्गावर जागोजागी कमानी उभारण्यात आलेल्या आहेत. मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी होत आहे. इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फूलून गेला आहे. देहूतील विविध संस्था आणि ग्रामस्थांच्यावतीने अन्नदानासाठी मंडप उभारण्यात आलेले आहेत.
संत तुकाराम महाराज संस्थान, नगरपंचायत प्रशासन आणि देहूरोड पोलिसांनी पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ४०० पोलिस कर्मचारी तैनात आहेत.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांनी सांगितले, की यंदा पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रम सोमवारी दुपारी अडीचला मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपातून सुरु होईल. संस्थानच्यावतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. चांदीच्या पालखी रथाचे काम पूर्ण झाले असून, पिंपरी येथील कुशल वर्मा बंधूकडून रथाला पॅालीश करण्यात आलेली आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्या देहूत दाखल झालेल्या आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत येऊन गेल्याने विविध विकास कामे पूर्ण झालेली आहेत. गावातील रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे. पालखीमार्ग, वैकुंठस्थान मंदिराकडे जाणारा मार्ग नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने पाणी मारून स्वच्छ धुण्यात आले. नगरपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा, महावितरण आदी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सोमवारी (ता. २०) आणि मंगळवारी (ता. २१) देहूतील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करणार आहे.
…असा होईल सोहळा
- पहाटे साडेचार – देऊळवाड्यात काकडा
- पहाटे पाच – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संस्थानच्यावतीने महापूजा होईल.
- साडेपाच – संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा
- सहा – वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा
- सकाळी सात – पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्यावतीने महापूजा
- सकाळी नऊ ते ११ – इनामदारवाड्यात संत तुकाराम महाराज पादुका पूजन
- सकाळी १० ते १२ – रामदास महाराज मोरे (देहूकर) यांचे पालखी प्रस्थान सोहळा काल्याचे कीर्तन.
- दुपारी अडीचला – इनामदारवाड्यातून संत तुकाराम महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात आणण्यात येतील. अडीचला पालखी प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात होईल.
- सायंकाळी पाच – पालखी प्रदक्षिणा होईल.
- सायंकाळी साडेसहा – मुख्य देऊळवाड्यातून पालखी सोहळा इनामदार वाड्याकडे मार्गस्थ. इनामदारवाड्यात पालखी सोहळा मुक्कामी असेल.