दहा लाख रूपये दंड वसुलीचे उद्दिष्ट कशाच्या आधारे दिले!
: महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मागवला खुलासा
: सर्वच स्तरांतून झाला विरोध
पुणे: कोरोनाचे नियम न पाळल्यास महापालिकेच्या वतीने दंड वसूल केला जातो. याच दंडाच्या माध्यमातून दररोज 10 लाख रुपये वसूल करण्याचा फतवा उपायुक्त माधव जगताप यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना काढला होता. याबाबत ‘कारभारी’ ने वृत्त प्रसारित केले होते. याचे पडसाद शहरभर उमटू लागले होते. नागरिक व व्यापारी वर्गातून याचा विरोध केला जाऊ लागला. त्यामुळे महापालिकेने आपल्या पहिल्या आदेशात बदल केला आहे. मात्र याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाच्या या आदेशा बाबत नाराजी दर्शवली आहे. तसेच कशाच्या आधारावर 10 लाख रुपये वसूल करण्याचे आदेश दिले, याचा खुलासा करण्याचे आदेश देखील महापौरांनी उपायुक्त माधव जगताप यांना दिले आहेत.
– महापौरांनी दिल्या सूचना
याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी एक आदेश सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जारी केला होता. त्यानुसार मास्क न घालणे, सोशल डिस्टंसिन्ग न ठेवली तर कारवाई कडक करण्यास सांगितले गेले होते. शिवाय यातून दररोज 10 लाख रुपये वसूल करण्यास सांगितले होते. याबाबतचा दररोज अहवाल उपायुक्तांना द्यावा लागणार असून दररोजचे उद्दिष्ट्य पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. मात्र याचा सर्व स्तरातून विरोध होऊ लागला. व्यापारी वर्ग देखील आक्रमक झालेला दिसला. शिवाय महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आदेश तात्काळ रद्द करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे महापालिकेने आपल्या आदेशात बदल केला आहे व नवीन आदेश जारी केला आहे. शिवाय महापौरांनी मास्क न लावणे, सोशल डिस्टसिंग न पाळणे आदी कारणातून दिवसाला दहा लाख रूपये दंड वसुलीचे उद्दिष्ट कशाच्या आधारे दिले, याचा खुलासाही उपायुक्त माधव जगताप यांच्याकडून मागवला आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त माधव जगताप यांना सदर आदेश ताबडतोब रद्द करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत़. तसेच मास्क न लावणे, सोशल डिस्टसिंग न पाळणे आदी कारणातून दिवसाला दहा लाख रूपये दंड वसुलीचे उद्दिष्ट कशाच्या आधारे दिले, याचा खुलासाही त्यांच्याकडून मागविण्यात आला आहे़.
मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे
COMMENTS