१५ ते १८ वयोगटासाठी शहरात आता 40 लसीकरण केंद्रे :
: महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
पुणे : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे मनपा हद्दीतील १५ ते १८ वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाचे नियोजन केले असून या वयोगटासाठी शहरात 40 स्वतंत्र लसीकरण केंद्राचे नियोजन केल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. यासाठी १ जानेवारीपासून कोविन पोर्टलवर नोंदणी सुरु होत असल्याचेही महापौर मोहोळ म्हणाले. 3 जानेवारी पासून हे लसीकरण सुरु होईल.
‘२००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले या लसीकरणासाठी पात्र ठरले असून लाभार्थ्यांना नव्या वर्षाच्या पाहिल्याच दिवशी लसीकरण नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे कोविन हे पोर्टल किंवा एप्लिकेशन वापरावे लागणार आहे. यात ५० टक्के ऑनलाईन आणि ५० टक्के ऑफलाईन नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. शिवाय लसीकरणाला येताना लाभार्थ्यांकडे आधारकार्ड/ओळखपत्र आवश्यक असणार आहे, असेही महापौर मोहोळ म्हणाले.
पात्र लाभार्थ्यांची संख्या, एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि ओमायक्रोन विषाणूच्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षता घेता १५ ते १८ वयोगटासाठी सुरु होणाऱ्या कोरोना लसीकरणाची केंद्रांची संख्या ५ वरून ४० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण वेळेत, वेगाने आणि सुकर करण्याचा आपला प्रयत्न आहे, त्याला निश्चितच यश येईल, हा विश्वास वाटतो’.
– मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे
COMMENTS