PMC Engilsh Medium Schools | ८ इंग्रजी शाळांसाठी ९ वर्षांचा करार; आयटीच मूव्हमेंटला प्रति विद्यार्थी २९ हजार रुपये | महिला-बाल कल्याण समितीची मंजुरी
| आता शिक्षण आणि स्थायी समितीच्या निर्णयाकडे लक्ष!
PMC Education Department – The Karbhari News Service – पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागांतर्गत सुरू असलेल्या ८ इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी आता महापालिका प्रशासन आर्थिक जबाबदारी स्वीकारणार आहे. या शाळा चालवण्यासाठी आयटीच मूव्हमेंट (ITach Movement) या संस्थेला प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष २९ हजार रुपये देण्याच्या प्रस्तावाला महिला व बाल कल्याण समितीने मान्यता दिली आहे. या प्रस्तावानुसार पुढील ९ वर्षांसाठी या संस्थेकडे शाळा चालवण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. आता हा प्रस्ताव शिक्षण समिती आणि स्थायी समितीमार्फत मुख्य सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाच्या अंतिम मंजुरीकडे लक्ष लागले आहे. (PMC Women and Child Welfare Committee)
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या पत्रानुसार, सध्या PPP (Public Private Partnership) तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या या ८ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये एकूण २ हजार २९३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये ही विद्यार्थी संख्या सुमारे २ हजार ५०० पर्यंत पोहोचण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
२०१५ पासून संस्थेकडून शाळांचे संचालन
आयटीच मूव्हमेंट ही संस्था २०१५ पासून महापालिकेच्या या ८ इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवत आहे. आतापर्यंत संस्थेकडून CSR (Corporate Social Responsibility) निधीच्या माध्यमातून शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन, शैक्षणिक साहित्य आणि अन्य शैक्षणिक खर्च भागवला जात होता. सन २०२५-२६ या वर्षात या शाळांसाठी सुमारे १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
मात्र, आगामी काळात CSR निधी उपलब्ध होण्याबाबत अडचणी निर्माण झाल्याने संस्थेने महापालिका प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली. त्यानुसार प्रशासनाने या शाळांसाठी प्रति विद्यार्थी खर्चाच्या आधारावर आर्थिक दायित्व स्वीकारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
सुरुवातीला ३३ हजारांची मागणी; चर्चेनंतर २९ हजारांवर सहमती
प्रशासनाच्या प्रस्तावानुसार २०२६ ते २०३५ या कालावधीसाठी प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष २९ हजार रुपये देण्याचा दर निश्चित करण्यात आला आहे. सुरुवातीला संस्थेने प्रति विद्यार्थी ३३ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. मात्र, ३० मार्च २०२६ रोजी झालेल्या चर्चेनंतर प्रति विद्यार्थी २९ हजार रुपये या दरावर सहमती झाली.
विशेष म्हणजे, निश्चित करण्यात आलेल्या या दरामध्ये ग्राहक किंमत निर्देशांकानुसार (CPI) दरवर्षी वाढ केली जाणार आहे. त्यामुळे पुढील वर्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आणि दरवाढीनुसार महापालिकेवरील आर्थिक दायित्व निश्चित होणार आहे.
पुण्यातील कोणत्या ८ शाळांचा समावेश?
या प्रस्तावात महापालिकेच्या खालील ८ इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे.
१. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे शाळा – येवलेवाडी
२. संत गाडगे महाराज शाळा – कोंढवा
३. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळा – औंध
४. विठ्ठलराव तुपे शाळा – हडपसर
५. राजर्षी शाहू महाराज शाळा – मुंढवा
६. पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा – कोथरूड
७. आचार्य विनोबा भावे शाळा – गंज पेठ
८. समता अशोक विद्यामंदिर – कर्वेनगर
विद्यार्थ्यांना DBT चा लाभ; इमारतीसह सुविधा महापालिकेच्या
या शाळांमधील विद्यार्थ्यांना महापालिकेच्या इतर शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच गणवेश आणि शैक्षणिक साहित्याकरिता थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच शाळांच्या इमारती, वीज आणि अन्य आवश्यक भौतिक सुविधा महापालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ७२ ब अन्वये या प्रस्तावातून महापालिका आर्थिक दायित्व स्वीकारणार आहे.
महिला-बाल कल्याण समितीची मंजुरी; आता मुख्य सभेच्या निर्णयाकडे लक्ष
या प्रस्तावाला महिला व बाल कल्याण समितीने मान्यता दिली आहे. आता पुढील प्रक्रियेत हा प्रस्ताव शिक्षण समिती आणि स्थायी समितीमार्फत मुख्य सभेसमोर ठेवण्यात येणार आहे. मुख्य सभेची मंजुरी मिळाल्यानंतरच या प्रस्तावाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होणार आहे.
महापालिकेच्या ८ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सध्या सुमारे अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. CSR निधीच्या अडचणीमुळे या शाळांच्या संचालनासाठी महापालिकेने आर्थिक जबाबदारी स्वीकारण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मुख्य सभेत मंजुरी मिळते का आणि पुढील ९ वर्षांसाठी शाळांच्या संचालनाची व्यवस्था कशी निश्चित होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

COMMENTS