PMC Contract Employees | बोनस बंद झाल्याने कंत्राटी सफाई कामगारांचा आक्रोश; प्रोत्साहन भत्त्याची मागणी
दिवाळीपूर्वी निर्णय घेण्याची मागणी; प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्याची प्रशासनाची हमी
PMC Employees Bonus – The Karbhari News Service – कायदेशीर तरतुदींमुळे बंद झालेला बोनस पुन्हा सुरू करावा किंवा त्याऐवजी प्रोत्साहन भत्ता द्यावा, या मागणीसाठी पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त)च्या वतीने मंगळवारी (२७ ऑक्टोबर) महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कंत्राटी सफाई कामगारांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दिवाळीपूर्वी निर्णय घेऊन कामगारांचे आर्थिक नुकसान भरून काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)
केंद्र सरकारच्या बोनस कायद्यातील २१ हजार रुपयांच्या वेतनमर्यादेमुळे कंत्राटी कामगारांचा बोनस बंद झाला असून, त्यामुळे प्रत्येक कामगाराचे दरमहा १,७५० रुपयांचे नुकसान होत असल्याचे युनियनने सांगितले. बोनस कायद्यात दुरुस्ती होऊन कामगार पुन्हा बोनससाठी पात्र ठरेपर्यंत नुकसानभरपाई म्हणून तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट यांनी कंत्राटदारांकडून कामगारांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप केला. काही ठेकेदारांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरलेली नसल्याचे, तसेच नवीन कामगारांची खातीही उघडलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. कंत्राटी कामगारांना सन्मानाची वागणूक मिळावी आणि त्यांच्या रोजगाराच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी प्रोत्साहन भत्ता देण्याबाबतचे निवेदन अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजीत नायर यांना देण्यात आले. या मागणीबाबतचा निर्णय स्थायी समितीत होईल, अशी हमी प्रशासनाकडून शिष्टमंडळाला देण्यात आली. मोर्चात युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार सहभागी झाले होते.

COMMENTS