Suhas Tingre NCP |  पुण्यात डेंग्यू-हिवतापाचा विळखा | औषध फवारणीतील दिरंगाईवर स्थायी समितीत संताप; नगरसेवक सुहास टिंगरे यांचा आरोग्य विभागाला जाब

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत डेंग्यू-हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि औषध फवारणीतील दिरंगाईचा मुद्दा उपस्थित.

HomeBreaking News

Suhas Tingre NCP |  पुण्यात डेंग्यू-हिवतापाचा विळखा | औषध फवारणीतील दिरंगाईवर स्थायी समितीत संताप; नगरसेवक सुहास टिंगरे यांचा आरोग्य विभागाला जाब

Ganesh Kumar Mule Oct 22, 2026 8:28 PM

PMC Food Testing Machine | पुणे महापालिकेचे ‘फूड टेस्टिंग मशीन’ गायब
Amol Balwadkar | चक्क धुरीकरण मशीन घेऊन अमोल बालवडकर महापालिकेत | डेंगू, चिकनगुनिया, झिका आणि मलेरिया प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी
PMC Asha Workers | आशा वर्कर्स यांचे वेतन देण्यात महापालिका आरोग्य विभागाकडून सातत्याने विलंब!

Suhas Tingre NCP |  पुण्यात डेंग्यू-हिवतापाचा विळखा | औषध फवारणीतील दिरंगाईवर स्थायी समितीत संताप; नगरसेवक सुहास टिंगरे यांचा आरोग्य विभागाला जाब

| आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू, अडीच वर्षांच्या बालिकेला ICU मध्ये उपचार!

 

PMC Standing Committee – The Karbhari News Service |  पुणे शहरात डेंग्यू आणि हिवतापाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांच्या घरांमध्ये औषध फवारणी करण्यात होणारी कथित दिरंगाई आणि आरोग्य विभागाच्या कामकाजावरून महापालिका प्रशासनाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. हिवतापामुळे आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना, तर डेंग्यूची लागण झालेल्या अडीच वर्षांच्या बालिकेला आठ दिवस ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घ्यावे लागल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक आणि समितीचे सदस्य सुहास विजय टिंगरे यांनी आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

| आठ वर्षांच्या मुलीचा हिवतापाने मृत्यू; घटनेने मन सुन्न

सुहास टिंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या जवळच्या नातेवाइकाच्या अवघ्या आठ वर्षांच्या मुलीचा रविवारी हिवतापामुळे मृत्यू झाला. या घटनेने मन सुन्न झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. शहरात डेंग्यू आणि हिवतापासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

| अडीच वर्षांच्या बालिकेला आठ दिवस ICU मध्ये उपचार

स्थायी समितीच्या बैठकीत डेंग्यू आणि हिवतापाच्या प्रादुर्भावावर चर्चा सुरू असतानाच टिंगरे यांना त्यांच्या प्रभागातील एका महिलेचा फोन आला. संबंधित महिलेच्या अडीच वर्षांच्या मुलीला डेंग्यूची लागण झाल्याने ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आठ दिवस उपचार घ्यावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

उपचारानंतर बालिका घरी परतली असली, तरी आठ दिवस उलटूनही तिच्या घरी औषध फवारणी करण्यात आली नसल्याची तक्रार संबंधित महिलेने केल्याचे टिंगरे यांनी सांगितले. डेंग्यूचा रुग्ण आढळल्यानंतरही संबंधित परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेवर होत नसतील, तर प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी नमूद केले.

| सभागृहात फोनवरील तक्रार ऐकवली

स्थायी समितीच्या बैठकीत केवळ कागदोपत्री माहितीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष परिस्थिती समोर आणण्यासाठी टिंगरे यांनी संबंधित महिलेचा फोन सभागृहातील माईकवरून सदस्यांना ऐकवला. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी आणि प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांमधील तफावत समोर आल्याचा दावा त्यांनी केला.

या प्रकरणावरून अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्यासमोर आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. डेंग्यू आणि हिवतापाचा प्रसार रोखण्यासाठी औषध फवारणी नियमित करणे, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे टिंगरे यांनी स्पष्ट केले.

| दोन महिन्यांपूर्वीच प्रशासनाला दिला होता इशारा

डेंग्यू आणि हिवतापाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत सुमारे दोन महिन्यांपूर्वीच प्रशासनाचे लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती, असे टिंगरे यांनी सांगितले. त्यावेळी औषध फवारणीचे कंत्राट संपल्याचे आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे कारण देत आरोग्य विभागाने असमर्थता व्यक्त केल्याचा आरोप त्यांनी केला.

मात्र, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असताना कंत्राट संपल्याचे किंवा मनुष्यबळ कमी असल्याचे कारण पुढे करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये दिरंगाई करता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

| फवारणी, मनुष्यबळ आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी

डेंग्यू आणि हिवतापाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी टिंगरे यांनी केली आहे. यामध्ये पुढील बाबींवर त्यांनी भर दिला आहे.

– डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णांची माहिती घेऊन संबंधित परिसरात तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे.
– रुग्णांच्या घरांसह परिसरात आवश्यकतेनुसार औषध फवारणी करणे.
– फवारणीच्या कामासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे.
– औषध फवारणीच्या कंत्राटातील अडचणी दूर करून कामकाजात खंड पडू न देणे.
– आरोग्य विभागाच्या कामकाजावर देखरेख ठेवून तक्रारींची वेळेत दखल घेणे.

| निष्क्रियता कायम राहिल्यास आंदोलनाचा इशारा

पुणेकरांचे आरोग्य धोक्यात असताना प्रशासनाने कारणे देण्याऐवजी प्रत्यक्ष काम करून दाखवावे, असे टिंगरे यांनी म्हटले आहे. डेंग्यू आणि हिवतापाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने कार्यवाही न झाल्यास प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिला.

शहरातील नागरिकांना डासांमुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळावे, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देण्याची गरज आहे. आता प्रशासन या तक्रारींची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि औषध फवारणीसह आवश्यक उपाययोजना किती वेगाने राबवते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: