PMC Diesel Rate Row | बाजारात ९९ रुपये, मनपाला १५९ रुपये प्रतिलिटर डिझेल? दरवर्षी १५ कोटींचा अतिरिक्त भार

Chandu Kadam, Congress Leader, PMC

HomeBreaking News

PMC Diesel Rate Row | बाजारात ९९ रुपये, मनपाला १५९ रुपये प्रतिलिटर डिझेल? दरवर्षी १५ कोटींचा अतिरिक्त भार

Ganesh Kumar Mule Oct 16, 2026 7:47 AM

PMC Social Welfare Department | पुणे महानगरपालिका दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रम 3 नोव्हेंबर पासून
PMC Kharadi STP Plant | पुणे महापालिकेच्या खराडी एसटीपी प्लांट चे अजितदादाकडून कौतुक! 
Scanning | PMC Pune | मालमत्ता व व्यवस्थापन विभागाच्या सर्व दस्तांचे होणार स्कॅनिंग! | 34 लाखांचा येणार खर्च

PMC Diesel Rate Row | बाजारात ९९ रुपये, मनपाला १५९ रुपये प्रतिलिटर डिझेल? दरवर्षी १५ कोटींचा अतिरिक्त भार

 

PMC Standing Committee – The Karbhari News Service – पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML) यांना डिझेल व पेट्रोल खरेदी करताना बाजारभावापेक्षा तब्बल ५९ रुपये प्रतिलिटर अधिक दर द्यावा लागत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. यामुळे महापालिकेवर दरवर्षी सुमारे १५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा दावा करत, Congress गटनेते अ‍ॅड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ आत्माराम कदम (Chandu Kadam Congress)  यांनी स्थायी समितीसमोर ठराव सूचना सादर केली आहे. शासन दरबारी पाठपुरावा करून मनपा व PMPML ला बाजारभावाने इंधन मिळवून देण्यासाठी आयुक्त स्तरावरून कार्यवाही करावी, अशी मागणी या सूचनेत करण्यात आली आहे.

 

पुणे महानगरपालिकेच्या मोटार वाहन विभागामार्फत तसेच विविध विभागांच्या अखत्यारीतील वाहने, कचरा वाहतूक करणारी वाहने, अग्निशमन वाहने, जेसीबी, पोकलेन, जनरेटर व अन्य यंत्रसामग्रीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर डिझेल व पेट्रोलची खरेदी केली जाते. त्याचप्रमाणे PMPML च्या विविध आगारांतील डिझेलवर चालणाऱ्या बसगाड्या व इतर वाहनांसाठीही मोठ्या प्रमाणावर इंधनाची आवश्यकता असते.

ही खरेदी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांच्याकडून करण्यात येते. मात्र पुणे मनपा व PMPML यांना आकारण्यात येणारे प्रतिलिटर दर आणि सर्वसामान्य बाजारातील किरकोळ विक्री दर यामध्ये मोठा फरक असल्याचे कदम यांनी निदर्शनास आणले आहे. सूचनेनुसार, आज बाजारात ९९ रुपये प्रतिलिटर दराने डिझेल उपलब्ध असताना पुणे मनपाला मात्र १५९ रुपये प्रतिलिटर दराने डिझेल घ्यावे लागत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘कथित’ आदेशाचा उल्लेख

सूचनेत नमूद केल्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित आदेशामुळे पुणे महापालिकेवर दरवर्षी सुमारे १५ कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. तसेच मनपा व PMPML ला बाजारभावापेक्षा सुमारे ५९ रुपये प्रतिलिटर अधिक दराने डिझेल खरेदी करावे लागत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे.

आकडेमोड : महिन्याला सव्वा कोटींहून अधिक जादा खर्च

सूचनेतील आकडेवारीनुसार, पुणे मनपाचा मोटार वाहन विभाग दर महिन्याला प्रतिदिन ८,००० लिटर या हिशोबाने २६ दिवसांसाठी २ लाख ८ हजार लिटर डिझेल घेत असतो. बाजारभावापेक्षा ५९ रुपये जास्त दराने डिझेल घेतल्यास प्रति महिना १ कोटी २२ लाख ७२ हजार रुपये जास्त द्यावे लागत आहेत. प्रतिवर्षी जवळपास १५ कोटी रुपये जास्त फक्त खासगी कंपन्यांची नियमावली मनपाला लागू केल्याने द्यावी लागत असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

“मनपाला खासगी कंपन्यांचे नियम का?”

पुणे महानगरपालिका ही सार्वजनिक हितासाठी कार्य करणारी स्थानिक स्वराज्य संस्था असून, PMPML ही सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा पुरवणारी संस्था आहे. त्यामुळे व्यावसायिक किंवा खासगी संस्थांना लागू असणारे इंधन दर, दरवर्गीकरण किंवा अन्य निकष या संस्थांना कोणत्या कायदेशीर व प्रशासकीय तरतुदींनुसार लागू करण्यात आले आहेत, याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे असल्याचा मुद्दा या सूचनेत उपस्थित करण्यात आला आहे.

काय आहे मागणी?

शासन दरबारी पाठपुरावा करून पुणे मनपाकरिता बाजार दराप्रमाणे डिझेल व पेट्रोल मिळण्यासाठी प्रयत्न करावेत आणि मनपा व PMPML कंपनीस बाजार दराने डिझेल व पेट्रोल मिळवून देण्यासाठी आयुक्त स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: