PMC Cleaning Contract Penalty | झाडणकाम न झाल्याने कंत्राटदार एल.व्ही.जी. फॅसिलिटीज इंडियावर कारवाई! | सहा लाखांचा दंड
| बिबवेवाडी व वानवडी-रामटेकडीत सव्वा सहा लाखांचा दंड, रस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य
Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे झाडणकाम गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत असलेल्या ‘परफॉर्मन्स बेस्ड’ झाडणकाम प्रकल्पात, बिबवेवाडी तसेच वानवडी-रामटेकडी या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत काम मिळालेल्या मे. एल.व्ही.जी. फॅसिलिटीज इंडिया प्रा.लि. या कंत्राटदार संस्थेने अपेक्षित कामकाज न केल्याचे समक्ष पाहणीत उघड झाले असून, महापालिकेने या संस्थेला एकूण ६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांच्या आदेशानुसार घनकचरा विभागाने ही कारवाई केली आहे.
काय आहे ‘परफॉर्मन्स बेस्ड’ झाडणकाम प्रकल्प?
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील झाडणकाम गुणवत्तापूर्ण होण्यासाठी ३ महिने कालावधीसाठी ‘परफॉर्मन्स बेस्ड’ झाडणकाम प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. यामध्ये मे. एल.व्ही.जी. फॅसिलिटीज इंडिया प्रा.लि. यांच्याकडे वानवडी-रामटेकडी व बिबवेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दैनंदिन झाडणकाम करण्याचे कामकाज देण्यात आले होते. १ ऑगस्ट २०२६ पासून हा प्रकल्प संबंधित संस्थेमार्फत सुरू करण्यात आला होता.
बिबवेवाडीत ३२५ बीट्सचे काम अपूर्ण
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्तांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केलेल्या समक्ष पाहणीत, इंद्रायणी रणदिवे रोड, बिबवेवाडी या परिसरातील रस्त्यांचे झाडणकाम झालेले नसून सर्वत्र कचरा व क्रॉनिक स्पॉट (कायमस्वरूपी कचरा साचण्याची ठिकाणे) असल्याचे निदर्शनास आले. तसेच पाहणीदरम्यान सफाई सेवक हद्दीमध्ये उपस्थितच नसल्याचेही आढळून आले.
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयासाठी परफॉर्मन्स बेस्ड झाडणकामाकरिता एकूण ३२५ कंत्राटी सफाई सेवक नियुक्त करण्याची मान्यता देण्यात आली होती. मात्र १७ सप्टेंबरच्या पाहणीदरम्यान हे सफाई सेवक हद्दीत काम करताना आढळले नसल्याने, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ३२५ झाडणहद्दींचे कामकाज झालेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निश्चित करण्यात आलेल्या कार्यप्रणालीनुसार (SOP) या ३२५ बीट्सचे झाडणकाम न झाल्याबद्दल मे. एल.व्ही.जी. फॅसिलिटीज इंडिया प्रा.लि. यांना रु. ३,२५,०००/- इतका दंड ठोठावण्यात आला आहे.
वानवडी-रामटेकडीतही २७५ बीट्सचे काम अपूर्ण
त्याच दिवशी म्हणजे १७ सप्टेंबर २०२६ रोजी वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केलेल्या समक्ष पाहणीत गॅलक्सी अपार्टमेंट, कोंढवा, सन शाईन क्लासिक, कोंढवा खुर्द, ब्रह्मा अव्हेन्यू रोड, कोंढवा खुर्द या परिसरातील रस्त्यांचेही झाडणकाम झालेले नसून तेथेही सर्वत्र कचरा व क्रॉनिक स्पॉट आढळले. या ठिकाणीही सफाई सेवक हद्दीत उपस्थित नसल्याचे आढळले.
वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयासाठी एकूण २७५ कंत्राटी सेवक नियुक्त करण्याची मान्यता देण्यात आली होती. मात्र पाहणीदरम्यान हे सेवकही हद्दीत काम करताना आढळले नसल्याने, एकूण २७५ झाडणहद्दींचे कामकाज न झाल्याचे स्पष्ट झाले. यासाठी संबंधित संस्थेला रु. २,७५,०००/- इतका दंड ठोठावण्यात आला आहे.
एकूण सहा लाखांचा दंड
अशा प्रकारे दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मिळून मे. एल.व्ही.जी. फॅसिलिटीज इंडिया प्रा.लि. यांच्यावर एकूण रु. ६,००,०००/- (सहा लाख रुपये) इतका दंड ठोठावण्यात आला असून, संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमार्फत ही दंडाची रक्कम संबंधित संस्थेकडून वसूल करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन्ही नोटिसांसोबत पाहणीदरम्यान काढलेले छायाचित्रांचे पुरावेही जोडण्यात आले आहेत.
१ ऑगस्टपासून सुरू असूनही काम अपेक्षेप्रमाणे नाही
विशेष म्हणजे, हा परफॉर्मन्स बेस्ड झाडणकाम प्रकल्प १ ऑगस्ट २०२६ पासूनच संबंधित संस्थेमार्फत सुरू करण्यात आला होता. मात्र दीड महिना उलटूनही अद्यापपर्यंत अपेक्षित कामकाज होत नसल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले असून, ही बाब गंभीर असल्याचे नमूद करत महापालिकेने ही कठोर कारवाई केली आहे.

COMMENTS