Viman Nagar Footpath Issue | विमाननगरमध्ये धक्कादायक प्रकार: चिमुकल्यांना चक्क दोरीच्या आधाराने रस्त्यावरून चालण्याची वेळ

विमाननगरमध्ये पदपथाअभावी चिमुकल्यांचा जीवघेणा प्रवास, दोरीच्या आधाराने रस्ता ओलांडताना विद्यार्थी

HomeBreaking News

Viman Nagar Footpath Issue | विमाननगरमध्ये धक्कादायक प्रकार: चिमुकल्यांना चक्क दोरीच्या आधाराने रस्त्यावरून चालण्याची वेळ

Ganesh Kumar Mule Sep 21, 2026 7:30 PM

MLA Fund | Sunil Tingre | सोसायट्यांमध्ये होणार आता आमदार निधीतून विकासकामे
Pune : PMC : नागरिकांना सूचना : गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद
New Fire Chief | देवेंद्र पोटफोडे यांची पुणे शहराचे नवीन अग्निशमन प्रमुख म्हणून नियुक्ती

Viman Nagar Footpath Issue | विमाननगरमध्ये धक्कादायक प्रकार: चिमुकल्यांना चक्क दोरीच्या आधाराने रस्त्यावरून चालण्याची वेळ

| ‘पूर्वेच्या ऑक्सफर्ड’मध्ये पदपथाअभावी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

Suhas Tingare NCP – (The Karbhari News Service) – ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील विमाननगर परिसरात चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. कैलास सुपर मार्केट चौक ते दत्त मंदिर चौक या मार्गावर पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व सलग पदपथाची पुरेशी व्यवस्था नसल्याने नर्सरीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना भरधाव वाहतुकीच्या रस्त्यावरून चालण्याची वेळ आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्त्यावरून नेण्यासाठी चक्क दोरीच्या साहाय्याने चालवावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे महापालिका प्रशासनाच्या पादचारी सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Vimannagar News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास टिंगरे यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. विमाननगरमधील कैलास सुपर मार्केट चौक ते दत्त मंदिर चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. या मार्गावर पादचाऱ्यांसाठी सलग, सुरक्षित आणि अडथळामुक्त पदपथ उपलब्ध नसल्याने नागरिकांना वाहतुकीच्या रस्त्यावरूनच मार्गक्रमण करावे लागते. त्याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना सहन करावा लागत आहे. शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना रस्त्यावरून चालताना अपघाताचा धोका निर्माण होत असून, त्यांच्या सुरक्षेसाठी दोरीच्या आधाराचा वापर करण्याची वेळ येणे ही शहराच्या पायाभूत सुविधांची दयनीय अवस्था दर्शविणारी बाब आहे.

– ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ की असुरक्षित शहर?

पुणे शहराची ओळख ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ अशी केली जाते. मात्र, याच शहरात लहान मुलांना सुरक्षितपणे चालण्यासाठी साधा पदपथही उपलब्ध नसणे, ही गंभीर बाब आहे. पदपथाच्या अभावामुळे केवळ गैरसोय होत नसून, चिमुकल्या विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. शहराच्या विकासात पादचारी सुरक्षेला प्राधान्य दिले जात नसल्याचे या प्रकारातून स्पष्ट होत असल्याचा आरोप होत आहे.

– महापालिकेने तातडीने पाहणी करावी

या मार्गाची महापालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करून सुरक्षित, सलग आणि अडथळामुक्त पदपथाची व्यवस्था करावी. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात. नागरिकांच्या, तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड स्वीकारता येणार नाही. पुण्याची ओळख केवळ ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणून नव्हे, तर सुरक्षित आणि सुयोग्य शहर म्हणूनही निर्माण झाली पाहिजे, अशी मागणी नगरसेवक सुहास विजय टिंगरे यांनी केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: