Pune GCC Meet | पुण्यात गुंतवणुकीचा नवा अध्याय | नवल किशोर राम आणि गणेश बिडकर यांच्या पुढाकाराने CM फडणवीसांची मोठी बैठक
| पुण्यात 1 लाख नोकऱ्यांचा महामार्ग मोकळा! 25+ ग्लोबल कंपन्यांच्या CEO शी मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट संवाद, PMC चा मोठा पुढाकार
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुण्यात कार्यरत असलेल्या ग्लोबल कॅपिबिलिटी सेंटर (जीसीसी) माध्यमातून सध्या जवळपास १ लाख नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला असून, शहरात या क्षेत्राचा आणखी विस्तार करण्यासाठी राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रात प्रथमच २५ हून अधिक ग्लोबल कॅपिबिलिटी सेंटर प्रमुखांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन पद्धतीने बैठकीत विविध कंपन्यांच्या प्रमुखांशी थेट संवाद साधत पुण्यातील गुंतवणुकीच्या संधी आणि उद्योगांसमोरील अडचणी जाणून घेतल्या. ही बैठक आयोजित करण्यासाठी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांनी विशेष पुढाकार घेतला.
पुणे शहरात नव्याने गुंतवणूक आणणे, सध्या कार्यरत असलेल्या कंपन्यांचा विस्तार करणे आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हा या बैठकीमागील प्रमुख उद्देश होता. उद्योगांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकार आणि पुणे महापालिका आवश्यक ते सहकार्य करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
ही बैठक आयोजित करण्यासाठी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांनी विशेष पुढाकार घेतला. राज्य सरकार, महापालिका आणि उद्योग क्षेत्र यांच्यात थेट संवादाचे व्यासपीठ निर्माण झाल्यामुळे पुण्यातील ग्लोबल कॅपिबिलिटी सेंटरच्या भविष्यातील विस्तारासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.
माहिती-तंत्रज्ञान, तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, संशोधन-विकास आणि जागतिक व्यावसायिक सेवांच्या क्षेत्रात पुण्याची क्षमता मोठी आहे. कुशल मनुष्यबळ, शिक्षण संस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मजबूत पायाभूत व्यवस्था यामुळे पुणे हे जागतिक कंपन्यांसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे.
सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, “पुण्यातील जागतिक क्षमता केंद्रांनी आतापर्यंत जवळपास एक लाख रोजगार निर्माण केले आहेत. या क्षेत्राचा भविष्यात आणखी विस्तार व्हावा आणि पुण्यात मोठ्या प्रमाणावर नवीन गुंतवणूक यावी, यासाठी या क्षेत्रातील प्रमुखांशी थेट संवाद साधणे गरजेचे होते. त्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकार आणि पुणे महापालिका पूर्ण सहकार्य करेल, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘पुणे का नाही?’ या विचारातून पुण्याला जागतिक कंपन्यांसाठी अधिक सक्षम गुंतवणूक केंद्र बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या बैठकीमुळे पुण्यातील नव्या गुंतवणुकीसाठी सकारात्मक पाऊल पडले असून, भविष्यात रोजगाराच्या आणखी मोठ्या संधी निर्माण होतील.”
——-
‘पुणे का नाही?’ Why Not Pune या विचारातून पुण्याला जागतिक कंपन्यांसाठी अधिक सक्षम आणि आकर्षक गुंतवणूक केंद्र बनविण्यासाठी राज्य सरकार, पुणे महापालिका आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. पुण्यात येणाऱ्या प्रत्येक नव्या गुंतवणुकीसोबत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि शहराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल. या बैठकीमुळे पुण्यातील जागतिक क्षमता केंद्रांच्या भविष्यातील विस्तारासाठी सरकार, महापालिका आणि उद्योग क्षेत्रातील समन्वय अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून, पुण्यात नव्या गुंतवणुकीचे मार्ग खुले होण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.
(Pune, GCC, Global Capability Centre, Devendra Fadnavis, Pune Municipal Corporation)

COMMENTS