Hinjewadi Shivajinagar Metro | हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो तातडीने सुरू करा | उदघाटनाचा सोहळा नंतर करा | माजी आमदार मोहन जोशी
Mohan Joshi Pune Congress – (The Karbhari News Service) – आयटी कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेता हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो तातडीने सुरू करा, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आज (रविवारी) केली आहे. (Pune News)
हिंजवडीमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग हा प्रकल्प हाती घेण्यात आला. तो तातडीने सुरू व्हावा, जेणेकरून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. नियोजित आराखड्यानुसार मार्च २०२५ मध्येच हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो धावू असे निश्चित करण्यात आले. ही मुदत उलटून गेली, तरी मेट्रो सुरू होईना, ती सुरू व्हावी यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने पाठपुरावा करत आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो मार्गिका तीन या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे. वास्तविक पाहता या मंजुरीनंतर मेट्रो त्या मार्गावर धावू लागणे अपेक्षित आहे आणि प्रवाशांची त्यात सोयही आहे. मात्र, मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यासाठी मेट्रो सेवा थांबविण्यात आली आहे, ही बाब संतापजनक आहे. प्रवाशांची गरज पाहता मेट्रो सेवा चालू करावी आणि उदघाटन सोहळा, जाहीरातबाजी नंतर करावी, लोकांना त्याच्याशी काही देणे घेणे नाही, असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
आयटी क्षेत्राला चालना मिळावी या कारणाने काँग्रेस पक्षाने आयटी पार्क विकसित केले. यामुळे अनेक तरूणांना पुण्यात रोजगार मिळाला, पुण्यातील आर्थिक उलाढाल वाढली. गेल्या १०, १२ वर्षात भाजप सरकारने येथील वाहतूक कोंडी, रस्त्यातील खड्डे अशा प्रकारच्या नागरी सुधारणा, सुविधांकडे दुर्लक्षच केले. ‘वाहतूक कोंडी चे केंद्र’ असे हिंजवडी आयटी पार्क परिसराचे वर्णन होऊ लागले आहे. खड्डे, अरुंद रस्ते या कारणांनी तीन-तीन तास वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडतात. मेट्रो तातडीने धावू लागली तर या कोंडीतून मुक्तता होईल, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

COMMENTS