PMC Name Policy | पुणे शहरात आता दोन छत्रपती शिवाजीनगर अस्तित्वात येणार?

Homeadministrative

PMC Name Policy | पुणे शहरात आता दोन छत्रपती शिवाजीनगर अस्तित्वात येणार?

Ganesh Kumar Mule Jul 08, 2026 6:09 AM

Pune PMC News | विविध विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणुका २७ फेब्रुवारीला 
PMC Name Policy | नाव देण्यासाठी चार नगरसेवकांची संमती आवश्यक! | नाव समितीची उपसूचना मुख्य सभेने फेटाळली
PMC Name Committee | ‘माहिती उपलब्ध नाही, तुम्हीच ठरवा’ | प्रशासनाच्या अभिप्रायाने नाव समिती पेचात!

PMC Name Policy | पुणे शहरात आता दोन छत्रपती शिवाजीनगर अस्तित्वात येणार?

| नाव समितीत दिल्या जाणाऱ्या अभिप्रायाने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे शहरात आता दोन छत्रपती शिवाजीनगर  अस्तित्वात येणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कारण शहरात एका परिसरात विशेष म्हणजे एका विधानसभा मतदार संघाचे हे नाव असून देखील आता दुसऱ्या एका परिसराला हेच नाव देण्याचा घाट घातला जात आहे. नगरसेवकांनी दिलेल्या प्रस्तावाला कुठलाही आक्षेप न घेता महापालिका प्रशासनाने देखील एकच नाव दुसऱ्या परिसराला देण्याबाबत सकारात्मक अभिप्राय दिला आहे. महापालिकेत नावाबाबत धोरण असताना देखील प्रशासन याचा अभ्यास करण्याची कुठलीही तसदी घेत नाही, हे यावरून दिसून येत आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे शहरात पूर्वीपासून भाम्बुर्डा गावठाण आणि आसपासचा परिसर हा छत्रपती शिवाजीनगर म्हणून ओळखला जातो. याच नावावरून शहरात विधानसभेत मतदारसंघ देखील अस्तित्वात आहे. असे असताना देखील प्रभाग क्रमांक ४० मधील कोंढवा बुद्रुक स नं ७ आणि १६ या परिसरास छत्रपती शिवाजीनगर असे नाव देण्याचा प्रस्ताव संबंधित प्रभागातील सर्व नगरसेवकानी नाव समिती समोर ठेवला होता. यावर कोंढवा उंड्री क्षेत्रिय कार्यालयाने आपला अभिप्राय सादर केला आहे. परिमंडळ ४ चे उपायुक्त यांच्या स्वाक्षरीने हा अभिप्राय देण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजीनगर हे नाव देण्यास काही हरकत नाही, असा अभिप्राय क्षेत्रीय कार्यालयाने दिला आहे. त्यामुळे आता शहरात दोन छत्रपती शिवाजीनगर अस्तित्वात येणार, अशी चर्चा केली जात आहे.

वास्तविक पाहत एकच नाव दोन ठिकाणी देऊ नये, यासाठी नाव समिती अस्तित्वात आणण्यात आली आहे. नावाबाबत धोरण निश्चित करण्यात आले आहे. मात्र याबाबत कुठलीही शहानिशा न करता आणि घाईने क्षेत्रीय कार्यालयाने अभिप्राय सादर केल्याचे दिसून येत आहे.

नाव देण्याबाबतच्या धोरणाला हरताळ!

प्रभागात एखाद्या ठिकाणी रस्ता, उड्डाणपूल, तसेच विविध वास्तूंना नाव देण्यासाठी प्रभागातील चारही नगरसेवकांची संमती आवश्यक आहे, असे धोरण मुख्य सभेने नुकतेच मान्य केले आहे. असे असताना नव्याने विकसित करण्यात येत असलेल्या ८४ मीटर रुंदीच्या कात्रज कोंढवा रस्त्यास नाव देण्याबाबत प्रभाग क्रमांक ४० मधील नगरसेवक यांनी प्रस्ताव दिला आहे. तसे पहिले तर संबंधित रस्ता हा महत्वाचा आणि मुख्य रस्ता आहे. हा रस्ता प्रभाग ३८, ३९, ४० आणि ४१ या प्रभागातून जात आहे. त्यानुसार या सर्व प्रभागातील नगरसेवकांची संमती यावर आवश्यक आहे.

असे असताना यावर देखील कोंढवा उंड्री क्षेत्रीय कार्यालयाने नाव देण्यास हरकत नसल्याच्या अभिप्राय दिला आहे. यावरून दिसून येत आहे की मुख्य सभेने मान्य केलेल्या धोरणाला देखील क्षेत्रीय कार्यालयाकडून हरताळ फासला जात आहे. घाईने आणि कुठलाही अभ्यास न करता असे अभिप्राय दिले जात असल्याने आता प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. याआधी देखील प्रशासनाकडून नाव देण्याबाबत शिफारस न करता माहिती उपलब्ध नाही, असे अभिप्राय दिले आहेत.

आता या प्रस्तावांवर नाव समिती काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: