Pulse Polio | राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजी | ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला  जवळच्या  लसीकरण केंद्रावर घेऊन जावे

Homeadministrative

Pulse Polio | राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजी | ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला  जवळच्या  लसीकरण केंद्रावर घेऊन जावे

Ganesh Kumar Mule Jun 25, 2026 7:04 AM

Tata Group Vs PMC Pune | टाटा ग्रुप कडून पुणे महापालिकेची राज्य सरकारकडे तक्रार!  | महापालिका राज्य सरकारला देणार अहवाल
Pune Traffic | शहरातील वाहतूक सुधारणा करण्याबाबत महापालिका आणि पोलिसांची संयुक्त बैठक!
Maharashtra Rain Update | आजपासून पुण्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा | नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Pulse Polio | राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजी | ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला  जवळच्या  लसीकरण केंद्रावर घेऊन जावे

| पुणे जिल्ह्यात ४ लाख ५३ हजारांहून अधिक बालकांना पोलिओचे डोस देणार

 

National Pulse Polio – (The Karbhari News Service) –  राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी विशेष पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून ० ते ५ वर्षे वयोगटातील ४ लाख ५३ हजार ५१० बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांनी दिली. (Pune News)

पोलिओ हा मानवाच्या शारीरिक स्थितीवर तसेच समाजाच्या आर्थिक विकासावर परिणाम करणारा अत्यंत गंभीर आजार आहे. या आजारामुळे बालकांना कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकते तसेच काही प्रसंगी मृत्यूही होऊ शकतो. अपंगत्वामुळे संबंधित व्यक्तीचे जीवन परावलंबी बनते. त्यामुळे पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केले असून त्यानुसार भारतात सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येत आहे.

अचानक आलेल्या अपंगत्वाचे (० ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमधील) सर्वेक्षण आणि मॉप-अप मोहिमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे देशातील पोलिओ रुग्णांची संख्या सातत्याने घटली आहे. सन १९९८ मध्ये देशात ४ हजार ३१६ पोलिओ रुग्ण आढळून आले होते. मात्र सन २०११ नंतर भारतात पोलिओचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. पुणे जिल्ह्यातही सन १९९९ नंतर पोलिओचा एकही रुग्ण नोंदविण्यात आलेला नाही.

तथापि, जागतिक स्तरावर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या शेजारील देशांमध्ये अद्यापही तुरळक स्वरूपात पोलिओ रुग्ण आढळून येत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भारतात पोलिओ लसीकरण मोहीम सातत्याने राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात २८ जून रोजी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

मोहीमेअंतर्गत जिल्ह्यात ३ हजार ८३९ पल्स पोलिओ लसीकरण बूथ उभारण्यात येणार असून त्यासाठी ९ हजार २१९ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ कार्यरत राहणार आहे. तसेच १ हजार ८३४ बूथ पर्यवेक्षक, २ हजार ९०८ गृहभेट पथके, १ हजार ७५६ गृहभेट पर्यवेक्षक, १२४ ट्रान्झिट पथके, ७८ नाईट पथके, २२२ मोबाईल पथके आणि ६५ जिल्हास्तरीय पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.

मोहीमेच्या दिवशी बूथवर उपस्थित राहू न शकलेल्या बालकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अशा बालकांना एक दिवसाच्या विश्रांतीनंतर ग्रामीण भागात पुढील तीन दिवस आणि शहरी भागात पुढील पाच दिवस घराघरांत जाऊन पोलिओचे डोस दिले जाणार आहेत.

प्रत्येक लसीकरण बूथवर आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), शिक्षक तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी कार्यरत राहणार आहेत. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी एसटी स्थानके, रेल्वे स्थानके, बाजारपेठा, यात्रा स्थळे, धार्मिक स्थळे, प्रवासी मार्ग, खाजगी दवाखाने आदी ठिकाणी विशेष बूथ, ट्रान्झिट पथके आणि मोबाईल पथकांमार्फत लसीकरण करण्यात येणार आहे.

मोहीमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी व्यापक पूर्वतयारी करण्यात आली असून जिल्हा आणि तालुकास्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम, कृती आराखड्याची आखणी, लसींचे वितरण, जनजागृती साहित्याचे वाटप तसेच विविध समन्वय बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि बूथवरील कर्मचारी व स्वयंसेवकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला २८ जून रोजी जवळच्या पल्स पोलिओ लसीकरण केंद्रावर घेऊन जावे आणि पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन या राष्ट्रीय मोहिमेला यशस्वी करावे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: