PMC SDD | महिला बाल कल्याण समितीच्या प्रत्येक सदस्याने आपल्या प्रभागात एक प्रकल्प राबवावा : श्रीनाथ भिमाले
| समाज विकास विभागाच्या योजनांमधील उत्पन्न मर्यादा व अर्थसहाय्य वाढवा : सदस्यांची मागणी
Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण समितीच्या एकदिवसीय कार्यशाळेत योजनांमधील अटी-नियम शिथिल करण्यासह उत्पन्न मर्यादा आणि अर्थसहाय्य रक्कम वाढवण्याची मागणी सदस्यांनी केली. तर स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रत्येक सदस्याने आपल्या प्रभागात किमान एक प्रकल्प यशस्वीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या. (PMC Women and Child Welfare Committee)
छ. शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग समिती हॉलमध्ये २४ जून रोजी ही कार्यशाळा झाली. समाज विकास विभागामार्फत सध्या सुरू असलेल्या व नव्याने विचाराधीन असलेल्या योजनांचे पीपीटीद्वारे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

समिती सदस्यांनी योजनांमधील अटी-नियमांमध्ये बदल करण्याबाबत सूचना केल्या. त्यात प्रामुख्याने उत्पन्न मर्यादा वाढवणे, काही योजनांच्या अर्थसहाय्य रकमेत वाढ करणे, वयोमर्यादेत बदल करणे या मागण्या करण्यात आल्या. तसेच काळानुरूप गरजेप्रमाणे नवीन योजना सुरू करण्याबाबतही सदस्य आग्रही होते. समाज विकास विभागामार्फत योजनांसंदर्भातील शंकांचे निरसन करण्यात आले.
सदस्यांना मार्गदर्शन करताना स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, “सभासद व अधिकारी यांनी समन्वय साधून समाज विकास विभागाकडील योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्या पाहिजेत. काळानुरूप गरजेप्रमाणे नवीन नवीन उपक्रम, योजना राबविणे आवश्यक आहे.”
त्यांनी पुढे आवाहन केले, “प्रत्येक महिला बाल कल्याण समिती सदस्यांनी स्वतः पुढाकार घेऊन समाज विकास विभागाकडील सर्व योजनांचा प्रचार व प्रसार करावा. तसेच किमान एक प्रकल्प आपल्या प्रभागात यशस्वीपणे राबविणे संदर्भात कार्यवाही करावी.”
या कार्यशाळेस महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अल्पना वरपे, सदस्य तन्वी दिवेकर, अर्चना पाटील, कोमल शेंडकर, भक्ती गायकवाड, रोहिणी चिमटे, ऐश्वर्या थोरात, ज्योत्स्ना कुलकर्णी, सुरेखा कवडे, अश्विनी लांडगे उपस्थित होत्या. तसेच उप आयुक्त आशा राऊत, मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण, सहायक समाज विकास अधिकारी राजेंद्र मोरे यांच्यासह विभागाचे अधिकारी व सेवक उपस्थित होते.
भिमाले यांच्या मार्गदर्शनाबद्दल अध्यक्षा अल्पना वरपे यांनी आभार मानले. आभार प्रदर्शन राजेंद्र मोरे यांनी केले.

COMMENTS