Shrinath Bhimale on Old Tree | विकासकामे थांबली तरी चालतील, मात्र शंभर, दीडशे किंवा दोनशे वर्षांच्या झाडांची तोड होऊ नये | श्रीनाथ भिमाले
| वृक्षलागवडीसाठी क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी दहा लाख ; पावसाळ्यात व्यापक मोहीम
PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – शहरात ५० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पुणे महापालिकेकडून यंदाच्या पावसाळ्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार असून त्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी दहा लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या मोहिमेसाठी एकूण दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. दरम्यान, विकासकामांच्या नावाखाली जुनी आणि ऐतिहासिक झाडे तोडण्यास परवानगी देता कामा नये, अशी भूमिका भिमाले यांनी स्पष्ट केली. शंभर, दीडशे किंवा दोनशे वर्षांपूर्वीची झाडे जतन करणे ही महापालिकेची जबाबदारी असून विकासकामे थांबली तरी चालतील, मात्र अशा झाडांची तोड होऊ नये, असे त्यांनी सांगितले. (Pune Municipal Corporation – PMC)
महापालिकेच्या अंदाजपत्रकात शहरात ५० लाख झाडे लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवडीची व्यापक मोहीम हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेत देशी वृक्षप्रजातींना प्राधान्य दिले जाणार असून शहरातील टेकड्या, मोकळ्या जागा आणि सार्वजनिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाणार आहे.
वृक्षलागवड मोहिमेत स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी संघटना आणि सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. शहरातील टेकड्यांवर वृक्षलागवड करण्यासंदर्भात लवकरच महापालिकेत विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये नियोजन निश्चित केले जाणार आहे.
बेकायदेशीररीत्या झाडे तोडणाऱ्या किंवा काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकरणांत संबंधितांना निलंबित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. झाडांबाबत महापालिकेच्या नियमावलीत जे नियम आहेत त्यांचे काटेकोर पालन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एखादे झाड काढावे लागल्यास त्याबदल्यात किमान दुप्पट झाडे लावणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन करण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून वृक्षसंवर्धन आणि वृक्षलागवड या दोन्ही बाबींवर समान भर दिला जाणार असल्याचे भिमाले यांनी सांगितले.

COMMENTS