Katraj Kondhwa Road Action | कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेची धडक कारवाई
राजस सोसायटी परिसरात संयुक्त पथकाची कारवाई; ५० मीटर रुंद रस्त्याचा मार्ग मोकळा
सातारा-सोलापूर रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील सातारा रस्ता ते सोलापूर रस्ता जोडणाऱ्या कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गंभीर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने शुक्रवारी मोठी कारवाई केली. राजस सोसायटी परिसरात रस्ता रुंदीकरणासाठी अनधिकृत बांधकामे, शेड, टपऱ्या आणि स्टॉल हटवण्यात आले. (Pune Municipal Corporation – PMC)
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर आणि अतिक्रमण प्रभारी रमेश शेलार यांच्या नियंत्रणाखाली पथ, बांधकाम, अतिक्रमण, भूसंपादन व व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई केली.
कात्रजकडून कोंढव्याकडे जाताना निखिल मार्बल ते एस.बी.आय. चौक, सुंदरबन या भागात प्रस्तावित रस्तारुंदीकरणासाठी बाधित ठरणाऱ्या मिळकतींमधील पक्की बांधकामे, अनधिकृत शेड, टपऱ्या आणि स्टॉल हटवण्यात आले. कारवाईदरम्यान ११५०० चौ.मी. व्यावसायिक आणि १४१० चौ.मी. निवासी मिळकतींवर कारवाई करण्यात आली. यात दुमजली ९ आरसी इमारती, १४ पत्र्याचे शेड, १२ स्टॉल आणि सीमाभिंतींचा समावेश आहे. कारवाईसाठी ६ जेसीबी, १४ डम्पर, २ क्रेन, २५ बिगारी आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तैनात होते. अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी उपस्थित मिळकतधारकांशी चर्चा करून उर्वरित मिळकतधारकांना स्वतःहून साहित्य काढून घेण्याचे आवाहन केले. यासाठी १० दिवसांचा कालावधी आधीच देण्यात आला होता. यापुढे मुदतवाढ देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
५० मीटर रस्त्याचे काम सुरू
पुणे शहरातील दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या आणि जड वाहतूक असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याचे महत्त्व वाढल्याने विकास आराखड्यातील ८४ मीटर रुंदीच्या रस्त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ३.५ किमी लांबीच्या या कामासाठी १०९ मिळकतधारकांच्या ४१० चौ.मी. जमिनीचा निवाडा जाहीर झाला असून ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या रस्त्यात मुख्य रस्ता, दोन्ही बाजूंचे सर्विस रस्ते, पावसाळी वाहिनी आणि माऊली नगर येथे ग्रेड सेपरेटरचा समावेश आहे. दरम्यान, NHAI मार्फत राजस चौक येथे उभारण्यात येणारा २६० मीटरचा उड्डाणपूल आणि त्यासाठी ४० मीटर लांबीचे सेवा रस्तेही विकसित करण्यात आले आहेत. राजस सोसायटीकडील सेवा रस्ता क्लिअरिंग पिरीयड संपल्यानंतर लवकरच वाहतुकीस खुला होणार आहे.
कारवाईच्या वेळी उप आयुक्त रमेश शेलार, अधिक्षक अभियंता अजय वायसे, कार्यकारी अभियंता अनिल सोनवणे, उप अभियंता दिगंबर बांगर, भूसंपादन अधिकारी अंकुश लिंबगे, उप अभियंता संदीप धोत्रे, कनिष्ठ अभियंता सचिन गावडे, योगेश नागणे आणि वैशाली गिरगे उपस्थित होते. महापालिका प्रशासनाने पुढील काही दिवस अशीच कठोर कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

COMMENTS