PMC 360 | राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या ‘पीएमसी ३६०’ प्रकल्पाची सिल्व्हर अवॉर्डसाठी निवड
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेने (PMC) डिजिटल प्रशासन आणि नागरिक-केंद्रित सेवा क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक यश संपादन करत राष्ट्रीय स्तरावर मानाचा सन्मान मिळविला आहे. भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभागामार्फत (DARPG) प्रदान करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या ‘पीएमसी ३६०’ या महत्त्वाकांक्षी डिजिटल परिवर्तन प्रकल्पाची ‘ई-गव्हर्नन्स अंतर्गत जिल्हा/शहरी स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावरील उपक्रम’ या श्रेणीत सिल्व्हर अवॉर्डसाठी निवड करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) प्रजीत नायर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सिस्टीम अॅडमिनीस्ट्रेटर राहुल जगताप यांच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही कालावधी मध्ये डिजिटल परिवर्तनाची व्यापक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये महानगरपालिके च्या संकेतस्थळाचे संपूर्ण आधुनिकीकरण, विविध डिजिटल प्रणालींची पुनर्रचना (Revamp), नवीन नागरिकाभिमुख सेवा प्रणालींची निर्मिती तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सेवा विकसित करण्यात आल्या. या सर्व उपक्रमांचे सादरीकरण नवी दिल्ली येथे तज्ज्ञ समितीसमोर करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापन प्रक्रियेत ‘पीएमसी ३६०’ प्रकल्पाची निवड करण्यात आली. विविध विभागांच्या समन्वयातून हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आला.
‘पीएमसी ३६०’ प्रकल्पाच्या अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. यासाठी Stark Digital Media Services Pvt. Ltd ने पुणे महापालिकेसाठी नवीन वेबसाइट डिझाइन विकसित केले आहे. ‘मनपा सेवा आपल्यासाठी’ या नावाने तयार केलेल्या या प्लॅटफॉर्मवर नागरिकांना महापालिकेच्या विविध सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. ऑनलाइन सेवा पोर्टल, तक्रारींचे विश्लेषण व व्यवस्थापन, व्हॉटसअॅप यांचा सेवा, तक्रार निवारण, माहिती उपलब्ध करून देणे यासाठी नागरिकाभिमुख वापर करण्यात येत आहे. पालिकेच्या वतीने एआय आधारित तंत्रज्ञानाचा विविध प्रकल्पांमध्ये वापर सुरु करण्यात आला आहे.
समृद्ध ऐतिहासिक वारशाची परंपरा जपत पुणे शहर आज डिजिटल प्रशासनातील देशातील अग्रगण्य शहरांपैकी एक म्हणून उदयास येत आहे. पीएमसी ३६० उपक्रमामुळे नागरिकांना जलद, पारदर्शक, सुलभ आणि विश्वासार्ह सेवा मिळत असून ‘स्मार्ट गव्हर्नन्स’च्या दिशेने पुणे महानगरपालिका नवा आदर्श निर्माण करत आहे. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ मधील हा सन्मान पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञान भागीदार आणि सर्व पुणेकर नागरिक यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.

COMMENTS