Naval Kishore Ram IAS | जनगणना कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही | अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर निलंबन व फौजदारी कारवाईचे आयुक्तांचे आदेश

Homeadministrative

Naval Kishore Ram IAS | जनगणना कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही | अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर निलंबन व फौजदारी कारवाईचे आयुक्तांचे आदेश

Ganesh Kumar Mule May 26, 2026 8:14 PM

PMC Ward Office Stregnthening | क्षेत्रीय कार्यालये अधिक बळकट करण्याच्या प्रस्तावाला मान्यता  | क्षेत्रीय अधिकारी, परिमंडळ उपायुक्त यांना महापालिका आयुक्तांनी दिले हे अधिकार! | अधिकार असताना आता प्रकरण वरिष्ठांना पाठवले तर होणार कारवाई
Naval Kishore Ram IAS | ५ लाखांवरील होणाऱ्या  विकास कामांची त्रयस्त संस्थेमार्फत तपासणी होत नाही  | महापालिका आयुक्तांनी काही खात्यांवर दर्शवली नाराजी 
Sunil Shinde | NUHM कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांपासून वेतन थकीत |  राष्ट्रीय मजदूर संघ आणि नगरसेवक सुनील शिंदे यांचा महापालिका आयुक्तांना इशारा

Naval Kishore Ram IAS | जनगणना कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही | अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर निलंबन व फौजदारी कारवाईचे आयुक्तांचे आदेश

 

Pune Census – (The karbhari News Service) –  जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य असून त्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट निलंबन व फौजदारी कारवाई करण्याचे कडक आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. जनगणना कामासाठी अद्याप रुजू न झालेल्या शासकीय, निमशासकीय व मनपा कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  (Pune News)

झोनल उपआयुक्त व चार्ज ऑफिसर्सची बैठक
प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त नवल किशोर राम यांनी सोमवारी मुख्य कार्यालयात सर्व झोनल उपआयुक्त व १५ सहायक आयुक्त तथा चार्ज ऑफिसर्स यांची आढावा बैठक घेतली. हाऊस लिस्टिंग ब्लॉक (HLB) अर्थात प्रगणक गटांचे काम सुरू न झालेल्या किंवा संथगतीने सुरू असलेल्या भागाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

६०% काम सुरू, ५ कार्यालयांत दिरंगाई
पुणे मनपाच्या ६०% गटांचे काम सुरू झाले आहे. मात्र उर्वरित गटांचे काम अद्याप सुरू न झाल्याबद्दल आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नगर रोड, येरवडा-वाघोली, ढोले पाटील रोड, औंध-बाणेर व सिंहगड रोड या ५ क्षेत्रीय कार्यालयांत ५०% गटांचेही काम सुरू झाले नसल्याचे निदर्शनास आले.

२ दिवसांत १००% काम सुरू करण्याचे निर्देश
सर्व चार्ज ऑफिसर्सना पुढील दोन दिवसांत उर्वरित सुमारे ११ हजार गटांचे काम ऑनलाइन अॅपद्वारे १००% सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. अद्याप हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांशी तात्काळ दूरध्वनीवरून संपर्क साधून कामावर रुजू होण्यास सांगावे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

अनुपस्थितीवर कारवाईचा बडगा
जनगणना अधिनियमानुसार कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई प्रस्तावित करावी.  संबंधित कार्यालय प्रमुखांना अशा कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश द्यावेत.  मनपाच्या प्राथमिक शिक्षण विभाग व सेवकवर्गातील अद्याप रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने हजर राहण्यास सांगावे, अन्यथा निलंबनाची कारवाई करावी.  कंत्राटी शिक्षकांना जनगणना कामासाठी रुजू करून घ्यावे व गरजेनुसार त्यांच्या सेवामुदतीस मुदतवाढ द्यावी.  ज्या शासकीय कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले नाही, त्यांना अर्धशासकीय पत्र पाठवून तातडीने कर्मचारी उपलब्ध करण्यास सांगावे.

अभियंते, लिपिकही जनगणनेला
कामासाठी आवश्यकतेनुसार मुख्य कार्यालयातील अभियंते व लिपिक संवर्गातील सेवकांचीही नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले. सर्वात कमी काम असलेल्या सुपरवायझर्सची आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन आढावा घेण्याचे निर्देश दिले.

चार्ज ऑफिसर्सना नोटीस
ज्या चार्ज ऑफिसर्सच्या कार्यक्षेत्रात काम असमाधानकारक आहे, त्यांना लेखी नोटीस बजावून खुलासा मागविण्यात येणार आहे. सर्व चार्ज ऑफिसर्स व झोनल उपायुक्त यांनी काम मुदतीत पूर्ण करावे. यासाठी रोज आयुक्त स्तरावर व्हीसीद्वारे किंवा समक्ष आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

“जनगणना हे अत्यंत महत्त्वाचे व प्राधान्याचे शासकीय काम आहे. यात कोणतीही दिरंगाई अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे तसेच जॉइंट डायरेक्टर, जनगणना तथा उपायुक्त विजय लांडगे उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: