Ebola Outbreak | इबोला उद्रेकामुळे WHO कडून ‘पब्लिक हेल्थ इमर्जन्सी’ घोषित
| भारताचा नागरिकांना काँगो, युगांडा, दक्षिण सुदान दौरा टाळण्याचा सल्ला
WHO on Ebola – (The Karbhari News Service) – डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडामध्ये इबोलाच्या बूंदीबुग्यो स्ट्रेनचा उद्रेक झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने 17 मे 2026 रोजी ‘पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न’ घोषित केली आहे. आफ्रिका सीडीसीने देखील याला ‘पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ कॉन्टिनेंटल सिक्युरिटी’ म्हणून जाहीर केले आहे. (Bundibugyo Virus)
भारत सरकारचा इशारा
या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नागरिकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. पीआयबी दिल्लीने आज सकाळी 8:24 वाजता याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले.
WHO च्या आपत्कालीन समितीने 22 मे 2026 रोजी तात्पुरत्या शिफारसी जारी केल्या आहेत. त्यानुसार विमानतळ व बंदरांवर रोग निरीक्षण मजबूत करण्याचे, बूंदीबुग्यो विषाणू आढळलेल्या भागातून येणाऱ्या तापाच्या रुग्णांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच बाधित भागात प्रवास न करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
बूंदीबुग्यो स्ट्रेन धोकादायक
इबोला हा बूंदीबुग्यो विषाणूमुळे होणारा गंभीर रक्तस्रावी ताप आहे. या आजाराचा मृत्यूदर खूप जास्त आहे. सध्या बूंदीबुग्यो स्ट्रेनसाठी कोणतीही अधिकृत लस किंवा विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. काँगो व युगांडाला लागून असलेल्या देशांसह दक्षिण सुदानमध्ये रोग प्रसाराचा धोका जास्त असल्याचे WHO ने म्हटले आहे.
भारतात रुग्ण नाही
भारतामध्ये बूंदीबुग्यो स्ट्रेनमुळे होणाऱ्या इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र खबरदारी म्हणून केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत. सध्या या देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांनी स्थानिक आरोग्य यंत्रणांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा व दक्षिण सुदानमध्ये विनाकारण प्रवास करू नये, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

COMMENTS