Pramod Nana Bhangire on Pune Rain | पहिल्याच पावसात पुणे जलमय | ‘कोट्यवधींचा निधी गेला कुठे?’ प्रमोद नाना भानगिरे यांचा सवाल

Homeadministrative

Pramod Nana Bhangire on Pune Rain | पहिल्याच पावसात पुणे जलमय | ‘कोट्यवधींचा निधी गेला कुठे?’ प्रमोद नाना भानगिरे यांचा सवाल

Ganesh Kumar Mule May 22, 2026 8:04 PM

Pramod Nana Bhangire | शिवसेना महापालिका प्रशासनाला घेरणार | अल्टिमेटम देऊनही कामे पूर्ण न झाल्याने हजारोंच्या संख्येने केले जाणार आंदोलन | प्रमोद नाना भानगिरे
Loksabha Election | Shivsena Pune | शिवसेनेचे मिशन 48 ..!  लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु 
Pune Shivsena | शिवसेनेच्या वतीने हडपसरमध्ये “व्यसनांची होळी”; जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त तरुणांच्या जनजागृतीचा निर्धार

Pramod Nana Bhangire on Pune Rain | पहिल्याच पावसात पुणे जलमय | ‘कोट्यवधींचा निधी गेला कुठे?’ प्रमोद नाना भानगिरे यांचा सवाल

 

Pune Rain News – (The Karbhari News Service) –  शुक्रवारी दुपारपासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याने  शिवसेना  पक्षाने महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी “पहिल्याच पावसात पुणे जलमय झाले आणि महापालिकेच्या विकासाच्या गप्पांचा फुगा फुटला” अशी घणाघाती टीका केली. (Pune News)

भानगिरे म्हणाले, “थोड्याशा पावसात डेक्कन, शिवाजीनगरसारखे मध्यवर्ती भाग पाण्याखाली जात असतील तर कोट्यवधी रुपयांचे काम नेमके कुठे झाले? पुणेकरांनी भरभरून मतदान केले ते रस्ते आणि नाले बनताना पाहण्यासाठी का?” नालेसफाई, स्टॉर्म वॉटर ड्रेन या कामांवर दरवर्षी खर्च होतो, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती बदलत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

Screenshot

शहरातील ड्रेनेज यंत्रणेच्या अस्तित्वावरच भानगिरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ड्रेनेज यंत्रणा नेमकी अस्तित्वात आहे का फक्त कागदांवरच? सर्वसामान्य दुचाकीस्वारांनी रोज जीव मुठीत धरून प्रवास करायचा आणि सत्ताधाऱ्यांनी फक्त श्रेयवादात रमायचे का?” असा सवाल त्यांनी केला.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुण्यात हजारो कोटींची कामे सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. यावर टीका करताना भानगिरे म्हणाले, “स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणेकरांना पाण्यात बुडवण्याचा हा कोणता विकास मॉडेल आहे? अधिकारी ऑन फिल्ड कधी दिसणार? की फक्त एसी कार्यालयांमधूनच पुणे चालवणार?”

पहिल्याच पावसात शहरातील प्रमुख रस्ते, चौक व सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. याकडे लक्ष वेधत भानगिरे म्हणाले, “पहिलाच पाऊस आणि पुणेकर बेहाल झाले. अजून पूर्ण पावसाळा बाकी आहे. पुणेकरांच्या संयमाचा अंत पाहू नका.”

महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त करत त्यांनी पुढे म्हटले की, “पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा जाहीर धिक्कार करतो.” पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचे दावे प्रशासनाने केले होते. मात्र प्रत्यक्षात पहिल्याच पावसाने हे दावे फोल ठरल्याचे चित्र आहे.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस विजांसह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही भानगिरे यांनी दिला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: