PMC Vs Pune Irrigation | ४०० कोटी जलसंपदा विभागाकडे प्रलंबित, हे विधान तथ्यहीन | पाटबंधारे विभागाने पुन्हा महापालिकेला पत्र पाठवत ९४८ कोटी थकबाकी देण्याची केली मागणी 

Homeadministrative

PMC Vs Pune Irrigation | ४०० कोटी जलसंपदा विभागाकडे प्रलंबित, हे विधान तथ्यहीन | पाटबंधारे विभागाने पुन्हा महापालिकेला पत्र पाठवत ९४८ कोटी थकबाकी देण्याची केली मागणी 

Ganesh Kumar Mule Mar 19, 2026 7:12 PM

Pune Traffic | मुख्यमंत्रीसाहेब पुण्याला अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) मिळण्यासाठी मुहूर्त कधी लागणार? – माजी आमदार मोहन जोशी
Urban Poor Medical Scheme | शहरी गरीब वैद्यकीय योजना | नागरिकांचे हेलपाटे वाचवण्यासाठी ऑनलाईन सोबत ऑफलाईनची देखील असणार सुविधा!
Kranti Din | क्रांति दिवस उत्साहात संपन्न | महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचा उपक्रम 

PMC Vs Pune Irrigation |४०० कोटी जलसंपदा विभागाकडे प्रलंबित, हे विधान तथ्यहीन | पाटबंधारे विभागाने पुन्हा महापालिकेला पत्र पाठवत ९४८ कोटी थकबाकी देण्याची केली मागणी

 

Pune Water Supply – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका आणि पुणे पाटबंधारे विभाग यांच्यात पाणी वापर आणि पाणीपट्टी थकबाकी वरून शीतयुद्ध सुरू आहे. पाटबंधारे विभागाने ९३२ कोटींची थकबाकी पुणे मनपाकडे असल्याचे सांगत पाणी तोडण्याचा इशारा दिला होता. यावर पुणे मनपाने देखील पाटबंधारे ने चुकीची बिले दिली असल्याचा दावा करत बिलापेक्षा ४११ कोटी रुपये जास्त दिले असल्याचा दावा केला होता. याबाबत महापालिकेने राज्याचे अपर मुख्य सचिव यांना देखील अवगत केले होते. दरम्यान यावरून पुन्हा पाटबंधारे विभागाने महापालिकेला डिवचले आहे. विभागाने म्हटले आहे कि, अतिरिक्त पाणीवापर तसेच प्रदूषण दंडनीय रक्कम अदा केलेली नसल्यामुळे थकबाकी असताना   ४०० कोटी जलसंपदा विभागाकडे प्रलंबित आहे, हे विधान तथ्यहीन आहे. तसेच ९४८ कोटींची थकबाकी भरा, अन्यथा पाणीपुरवठा नजीकच्या कार्यकाळात खंडीत करण्यात येईल, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.   (PMC Water Supply Department)

 

पाटबंधारे विभागाने महापालिकेला नुकतेच एक पत्र पाठवले होते. त्यात म्हटले की, खडकवासला प्रकल्पातून महापालिकेला ११.६० टीएमसी इतका पाणी कोटा मंजूर आहे. मात्र महापालिकेने 2024-25 सालात २०.४४ टीएमसी पाणी वापरले आहे. म्हणजे ८.८४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरले आहे. महापालिकेच्या ज्यादा पाणी वापराने सिंचनास पाणी देणे जिकिरीचे होते आहे. 2025-26 चा देखील पाणी कोटा संपत आला आहे. आता महापालिकेने ११.२३ TMC पाणी वापरले आहे. हा कोटा संपल्या वर पाणीपुरवठा खंडित केला जाईल. खडकवासला तून पाणी उचलता येणार नाही. त्यामुळे दुसरी सोय महापालिकेने करावी, असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. तसेच ९३२ कोटींची थकबाकी तत्काळ भरण्याचे आदेश देखील दिले होते.

यावर महापालिकेने म्हटले होते की, पाटबंधारे विभागाने दिलेली थकबाकी ही ज्यादा आणि अवाजवी असून थकबाकी भरणे मनपाच्या आर्थिक हिताचे नाही. त्यामुळे थकबाकी प्रलंबित आहे. पाटबंधारे विभागाने चुकीच्या पद्धतीने बिलाची आकारणी केल्याने ही थकबाकी अवाजवी दिसत आहे. पाणी कोटा देखील चुकीच्या पद्धतीने विचारात घेतला आहे. असे महापालिकेने म्हटले आहे. पुणे शहरात प्रक्रिया उद्योगाचा पाणीवापर हा शून्य असताना तो सरसकट ५% गृहीत धरला आहे. STP Penalty देखील चुकीच्या पद्धतीने आकारली आहे. असे मनपा ने म्हटले आहे.

महापालिकेने म्हटले  की, पाटबंधारे विभागाने सादर केलेले बिल, पुणे मनपा ने अदा केलेले बिल, एकूण थकबाकी याच्या तक्त्यानुसार पुणे मनपाने सुमारे ४११ कोटी जास्त बिल दिले आहे. याबाबत पाटबंधारे विभागाला कळवण्यात आले आहे. त्यामुळे बिलात दुरुस्ती करून बिले द्यावीत असे महापालिकेने म्हटले होते.

त्यानंतर नुकतेच पाटबंधारे विभागाने महापालिकेला पत्र पाठवले आहे. पाटबंधारे विभागाने म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिका मापदंडापेक्षा ६.५० TMC / वार्षिक नियमबाह्य व मापदंडापेक्षा अतिरिक्त पाणीवापर करीत आहे तसेच अद्यापर्यंत मनपाने अतिरिक्त पाणीवापराचे देयकसुद्धा अदा केलेले नाही. तसेच ६.५०+६.५० = १३ TMC पाणी व त्यावर प्रक्रिया न करता प्रदूषित पाणी सिंचनास नियमित देत आहेत, ही मोठी गंभीर बाब आहे. तसेच २०१६ पासून प्रदूषण दंड लावलेला आहे. परंतू अद्याप प्रदूषणाचा दंड पुणे महानगरपालिकेने दिलेला नाही. पुणे महानगरपालिकेकडील चालू वर्षातील ९४८.७९ कोटी थकबाकी आहे. थकबाकी तत्काळ अदा करण्यात यावी कारण २५/२६ च्या आर्थिक वर्षात महापालिकेने  केवळ ९७.२३ कोटी रक्कम भरलेली आहे .  पुणे महानगरपालिकेचा मंजूर वार्षिक कोटा १९.६० TMC संपुष्टात आलेला आहे, त्यामुळे आपला पाणीपुरवठा नजीक च्या कार्यकाळात खंडीत करण्यात येईल. अतिरिक्त पाणीवापर तसेच प्रदूषण दंडनीय रक्कम अदा केलेली नसल्यामुळे थकबाकी आपल्या कडे असताना आपणाद्वारे केलेले “ ४०० कोटी जलसंपदा विभागाकडे प्रलंबित आहे, हे विधान तथ्यहीन आहे, तथापि जलसंपदा विभागाकडे काही रक्कम बाकी आहे या आपणाकडून केलेल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ आपण तसे विवरण पत्र तात्काळ सादर करावे. असे पाटबंधारे विभागाने पत्रात म्हटले आहे.

 

यावर महापालिका प्रशासनाने देखील पाटबंधारे विभागाला खरमरीत पत्र लिहित चुकीच्या पद्धतीने बिले आकारली असल्याचे म्हटले आहे. ज्यादा पाणी वापर आणि पाणी कोटा वाढवण्याबाबत महापालिका कार्यवाही करत आहे. त्यामुळे थकबाकी आणि ज्यादा पाणीवापर याबाबत कुठली कारवाई करू नये, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान यावर आता पाटबंधारे विभागाचे अधिकारी महापालिका आयुक्त यांच्यासोबत याबाबत बैठक घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: