Pune Shivsena on Water Issue | शिवसेनेच्या वतीने पुणे महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वारावर हंडा मोर्चा | पाणीटंचाईच्या प्रश्नावर तात्काळ व प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी
| महापालिका आयुक्तांना देण्यात आले निवेदन
Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्र. 41 व परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्याबाबत तसेच पाणीटंचाई प्रश्नावर तात्काळ व प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करत नागरिकांच्या तीव्र भावना प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पुणे महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वारावर भव्य हंडा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. (Pune Breaking News)

शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. याबाबत शहर प्रमुख यांनी महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले. त्यात म्हटले कि, हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 41 तसेच परिसरातील विविध भागांमध्ये मागील काही काळापासून पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. परिसरामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आलेल्या असल्या, तरी प्रत्यक्षात त्या टाक्यांमध्ये नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक भागांमध्ये पाण्याचा अत्यंत कमी दाबाने पुरवठा होत आहे, तर काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः अनियमित स्वरूपाचा झाला आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

या गंभीर प्रश्नाबाबत शिवसेनेच्या वतीने यापूर्वीही विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आलेला आहे. पुणे महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना तसेच उपआयुक्तांना वेळोवेळी निवेदने सादर करून या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आलेले आहे. तसेच स्थानिक पातळीवर अनेकदा प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या प्रश्नाची माहिती देण्यात आलेली आहे. तथापि, या सर्व प्रयत्नांनंतरही आजपर्यंत प्रशासनाकडून कोणत्याही ठोस व प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तीव्र भावना प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पुणे महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वारावर भव्य हंडा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून पाणीटंचाईच्या प्रश्नावर तात्काळ व प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी नागरिकांनी मागणी केली.
या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची केली मागणी
1) प्रभाग क्रमांक 41 व परिसरातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांना नियमित, पुरेसा व नियोजित पाणीपुरवठा तात्काळ सुरु करण्यात यावा.
2) ज्या भागांमध्ये पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे अथवा पूर्णतः बंद आहे, त्या ठिकाणी पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तांत्रिक तपासणी करुन आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी.
3) पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत स्पष्ट व नियमित वेळापत्रक जाहीर करून नागरिकांना नियोजित वेळेनुसार पाणीपुरवठा मिळेल याची खात्री करण्यात यावी.
4) पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात टँकरच्या माध्यमातून नियमित पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी.
5) पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमित देखभाल, स्वच्छता व कार्यक्षम व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात यावे, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ पाणी उपलब्ध होईल.

COMMENTS