Pune Mayor Election | पुणे महापौर, उपमहापौर पदासाठी तिरंगी लढाई | उपमहापौर च्या निवडणुकीत भाजप काय भूमिका घेणार? विविध राजकीय चर्चांना उधाण!
PMC Pune – (The Karbhari News Service) – पुण्याचा महापौर आणि उपमहापौर या पदासाठी तिरंगी लढाई होणार हे स्पष्ट झाले आहे. दोन्ही पदांसाठी भाजप सहित राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस च्या वतीने अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान महापौर पदी भाजपच्या मंजूषा नागपुरे बसणार हे निश्चित मानले जात आहे. तर उपमहापौर निवडणूक ही रंजक असेल असे मानले जात आहे. यात भाजप काय भूमिका घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
– तीन पक्षाकडून अर्ज दाखल
महापौर आणि उपमहापौर यांची निवडणूक ही ९ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी आज अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार दोन्ही पदासाठी तीन पक्षाच्या उमेदवारही अर्ज दाखल केले आहेत. पुण्याचे महापौर हे महिलांसाठी राखीव आहे. यात भाजपचा महापौर होणार हे निश्चित आहे. त्यानुसार भाजपने मंजूषा नागपूरे यांचा अर्ज भरला आहे. तर राष्ट्रवादी कडून शीतल सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कांग्रेस कडून अश्विनी लांडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात नागपुरे यांना संधी मिळणार हे निश्चित आहे.
दुसरीकडे उपमहापौर पदासाठी देखील तीन पक्षाकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. भाजप कडून मूळचे आरपीआय चे असलेले मात्र आताची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढलेले परशुराम वाडेकर यांचा अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून दत्ता बहिरट आणि काँग्रेस कडून साहिल केदारी यांनी अर्ज भरला आहे.
– राष्टवादीला सॉफ्ट कॉर्नर!
नुकतीच झालेली निवडणूक ही महायुतीतील घटक पक्षांनी वेगवेगळी लढवली होती. यात भाजपने 119 जागा जिंकत एक हाती सत्ता स्थापन केली आहे. आरपीआय चे उमेदवार देखील भाजपच्या चिन्हावर लढले आहेत. असे असले तरीही राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी हे सत्तेत एकत्र आहेत. त्यामुळे उपमहापौर पदाची निवडणूक बाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. कारण अजित पवार यांचे नुकतेच अपघाती निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या उमेदवारास भाजप सॉफ्ट कॉर्नर देऊन उपमहापौर करणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे वाडेकर आणि बहिरट यांच्यातील लढाई महत्वपूर्ण मानली जात आहे. यात भाजपच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. कारण भाजप ऐनवेळी काहीही निर्णय घेऊ शकते, हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे.
– महापौर पदासाठी देखील होती दुसऱ्याच उमेदवाराची चर्चा
भाजपच्या या धडाकेबाज आणि अनपेक्षित निर्णय पद्धतीची चुणूक महापौर पदासाठी उमेदवार जाहीर करताना दिसून आली. कारण नगरसेविका मानसी देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केली जाईल, अशा चर्चांना उधाण आले होते. कारण ६ फेब्रुवारी ला होणारी ही निवडणूक फक्त मानसी देशपांडे यांच्या घरात लग्न असल्याने पुढे ढकलून ९ फेब्रुवारीला घेण्यात आली आहे. देशपांडे या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जातात. त्यामुळे सर्वांना वाटत होते की महापौर पदाचा उमेदवार या देशपांडे असतील. मात्र भाजपने सर्वांना आश्चर्य चकित करत नागपुरे यांना उमेदवारी दिली आहे.
– आवाजी मतदानाने होणार निवडणूक
दरम्यान महापौर, उपमहापौर निवडणूक ही ९ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे उपस्थित राहणार आहेत. यात आवाजी मतदान पुकारून प्रक्रिया केली जाणार आहे. अशी माहिती नगरसचिव योगिता भोसले यांनी दिली. भोसले यांनी पुढे सांगितले की, पिठासीन अधिकारी सुरुवातीला अर्ज वैध आणि अवैध ठरवतील. त्यानंतर माघारी साठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात येईल. माघार नाही कुणी घेतली तर मराठी वर्णानुक्रमे नावे पुकारून संबंधित पदासाठी निवडणूक प्रक्रिया केली जाईल. ज्या उमेदवाराला जास्त मते मिळतील त्याला विजयी घोषित केले जाईल.

COMMENTS