Yogendra Yadav | देशाला सध्या आणीबाणीपेक्षा अधिक धोका – योगेंद्र यादव यांचे प्रतिपादन
Samajwadi Ekjutata Sammelan – (The Karbhari News Service) – आणीबाणी काळात लोकशाही धोक्यात आली होती. मात्र आता मोदी सरकारच्या काळात लोकशाहीसह देशाची संस्कृती, सभ्यता, आयडिया ऑफ इंडिया धोक्यात आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि मोदींविरोधातील लढाई तीव्र करून एकूण अन्यायाच्या विरोधात परावर्तित केली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते योगेंद्र यादव यांनी केले. (Pune News)
समाजवादी चळवळीच्या ९० वर्षपूर्तीनिमित्त पुण्यात तीन दिवसीय समाजवादी एकजुटता संमेलन पार पडले. पुणे घोषणा पत्र या सत्रात यादव बोलत होते. अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्ती चळवळीचे नेते अविनाश पाटील होते. या सत्रामध्ये अमूल्य निधि (इंदौर), विनोद शिरसाठ, अशोक पांडा (छत्तीसगड), हरीश खन्ना, शाहिद कमाल, सिद्धराम पैटी आदी सहभागी होते. सुनीति सु. र., गीता आर यांनी घोषणा पत्राचा प्रस्ताव मांडला.
देशाला लोकशाहीवादी बनविण्याचे काम समाजवादी चळवळीने केले आहे. देशातील सध्याच्या प्रश्नांचा मुकाबला करण्याची ताकद देखील समाजवादी विचारांमध्ये आहे. प्रत्येक समाजवादी व्यक्तीने संघ, भाजप यांना प्रतिकार करणे हा पहिला धर्म आहे. अन्यथा त्यांना समाजवादी म्हणवून घेण्याचा अधिकारी नाही, असेही यादव म्हणाले.
राजकीय सामाजिक संस्था संघटनांमध्ये पन्नास पंचावन्न वय झाले तरी ते कार्यकर्ते स्वतःला तरुण समजतात. वयोवृद्ध झाल्यावरही पदांचा मोह त्यांना सुटत नाही. त्यामुळे व्यवकांनी संघर्ष करून संस्था संघटनांमधील सत्ता हस्तगत केली पाहिजे. अनेक ठिकाणी असे संघर्ष उभे राहिले आहेत, असे अविनाश पाटील म्हणाले.
| हिंदीभाषा दिन बंद करावा
मी स्वतः हिंदीप्रेमी आहे. मात्र हिंदी भाषा दिन साजरा करण्याची गरज नाही. सरकारने तो बंद करून भारतीय भाषा दिन सुरू करण्याची गरज आहे. हिंदी आणि इतर भाषांमध्ये वाद निर्माण केला जात आहे. उलट सर्व भाषांनी एकमेकांशी एकोपा निर्माण करून सरकारच्या विरोधात सांस्कृतिक लढाई लढली पाहिजे, असेही योगेंद्र यादव म्हणाले.

COMMENTS