चंद्रकांतदादांवर उठसुठ आरोप करणे हा प्रशांत जगतापांचा धंदा झालाय !
: महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जगतापांना सुनावले
पुणे: गेले दोन दिवस भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांच्यात चांगलाच वाद पाहायला मिळतो आहे. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासोबत महापौर आणि सभागृह नेते यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जगतापांना चांगलेच सुनावले. महापौर म्हणाले चंद्रकांतदादांवर उठसुठ आरोप करणे हा प्रशांत जगतापांचा धंदा झालाय. पण आता त्यांनी वैयक्तिक पातळीवरील टीका थांबवावी. तसे नाही झाले तर आम्हाला देखील वैयक्तिक पातळीवर यावे लागेल. असा इशारा महापौरांनी दिला आहे.
: आम्ही देखील विसरू पुण्याची राजकीय संस्कृती
महापौर म्हणाले, वैयक्तिक पातळीवर जाऊन आरोप करणे ही पुण्याची राजकीय संस्कृती नाही. तरीही जगताप असे आरोप करत असतील तर ते चुकीचे आहे. आम्हाला देखील मग राजकीय संस्कृती विसरावी लागेल. जगतापांनी शहराच्या हितावर बोलावे. आणि दोषी लोकांना सजा देण्याचे काम पोलिसांचे आहे. जगतापांनी त्यात पडू नये. महापौर पुढे म्हणाले, चंद्रकांत दादासारख्या माणसावर आरोप करताना जगतापांनी भान ठेवावे. तुमचे जेवढे वय नाही, तेवढा सामाजिक आणि राजकीय अनुभव त्यांना आहे. आम्ही जगतापांना फार गांभीर्याने घेत नाही. मात्र आता त्यांनी थांबावे. अन्यथा जगतापांना त्याची किंमत मोजावी लागेल.
: विरोधी पक्ष नेत्यांच्या पतीने जेलची हवा खाल्ली : बिडकर
दरम्यान सभागृह नेते गणेश बिडकर यांनी देखील राष्ट्रवादीचा समाचार घेतला. बिडकर म्हणाले राष्ट्रवादीचा एक विद्यमान नगरसेवक नुकतीच जेलची हवा खाऊन आला आहे. तर विरोधी पक्ष नेत्या यांचे पती बाबा धुमाळ देखील शिक्षण मंडळाचे अध्यक्ष असताना जेलची हवा खाऊन आले आहेत. बिडकर पुढे म्हणाले, तपास करण्यासाठी यंत्रणा आहेत. तपासामध्ये काही तथ्य असल्यास न्याय यंत्रणा आहे. आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून आवश्यक त्या चौकशीसाठी तयार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे वकीली का करत आहेत? हेच समजत नाही.
COMMENTS