PMC Ward 2 CCTV | सुरक्षेबाबत नागरिकच सजग असणे कौतुकास्पद : पोलिस निरीक्षक संतोष पाटील
– प्रभाग क्रमांक २ मध्ये कालवश उद्धवराव शिवाजी वावरे पदपथ नामफलक आणि सीसीटीव्हीचे उद्घाटन
– माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार
PMC Ward 2 CCTV | प्रभागात सुरक्षा रहावी यासाठी पोलिस यंत्रणा काम करतच आहे. प्रभागातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावले जात आहेत. मात्र नागरिकांनी देखील स्वतः पुढाकार घेऊन सीसीटीव्ही बसविण्याचा घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. नागरिकांनी सुरक्षेसाठी सजग राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी केले.
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक दोन नागपूर चाळ येथील पदपथाचे कालवश उद्धवराव शिवाजी वावरे नामकरण तसेच सीसीटीव्हीचे उद्घाटन डॉ. बी. एस. पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरिक्षक पाटील बोलत होते.
या वेळी कालवश उध्दव वावरे यांचे चिरंजीव प्रशांत वावरे, अशोक कांबळे, नामदेव घाटगे, मंगेश गोळे, ऍड. भगवान जाधव, सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते, जागृती तरुण मंडळ, मौलाना आझाद रिक्षा स्टँड, व्यापारी, पथारी व्यावसायिक, सुजाता महिला मंडळ, तक्षशिला बुद्धविहार, धम्मज्योती बुद्धविहार, त्रिरत्न बुद्धविहार, हिंदू जागृती मंचचे पदाधिकारी, प्रभागातील नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, रस्त्याचे नामकरण होण्यासाठी महापालिकेत मी ठराव मांडला होता. तो मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले होते. यासाठी प्रभागातील इतर तीन नगरसेवकांकडून या प्रस्तावासाठी पाठिंबा मिळविला. या प्रस्तावाला महापालिका स्तरावर मंजुरी मिळाली. त्याचे नामकरण झाल्यानंतर आज त्याच्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले याचा आनंद आहे. कालवश उद्धव वावरे हे पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व नागपूर चाळ प्रभागाचे लोकप्रतिनिधी होते. १९८७ आणि १९९३ अशा दोन वेळेस ते निवडून आले होते. आरपीआय पक्षाच्या राज्याच्या प्रमुख पदावर ते कार्यरत होते. त्यांचे प्रभागाचे योगदान पाहता त्यांचे स्मरण म्हणून हा नामफलक उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला. प्रभागातील जागृती तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याची संकल्पना मांडली होती.