BARTI Pune Fellowship फेलोशिप बाबत बार्टीचा सकारात्मक प्रतिसाद ; पीएचडी धारकांचे आमरण उपोषण स्थगित
| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची यशस्वी मध्यस्थी
BARTI pune Fellowship | फेलोशीपच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेले पीएचडी धारकांचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे. फेलोशीपपासून वंचित राहिलेल्या ४६ पीएचडी धारकांबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल. पीएचडी नोंदणी पासून ते आतापर्यंतचा प्रगती अहवाल स्वीकारून पुढील कार्यवाही करू, असे लेखी आश्वासन बार्टीकडून मिळाल्याने पीएचडी धारकांनी सुरू केलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. या प्रकरणी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी यशस्वी मध्यस्थी करत विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी पाठपुरावा केला. (BARTI Pune Fellowship)
पुण्यात पीएचडीचे संशोधक विद्यार्थी गेल्या सात दिवसांपासून बार्टी संस्थेबाहेर आमरण उपोषणाला बसले होते. बार्टी या संस्थेमार्फत मंजूर स्कॉलरशिप न मिळाल्याने हे आंदोलन सुरू होते. आंदोलन करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी बार्टी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत ठिय्या आंदोलन केले. या घटनेनंतर कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन मध्ये आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिस घेऊन गेले. या बाबतची माहिती मिळताच डॉ. धेंडे यांनी प्रत्यक्ष हजर राहून विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल न करण्याची विनंती पोलिस प्रशासनाला केली. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे विद्यार्थी संतप्त असल्याचे निदर्शनास आणले.
यावेळी बार्टीचे अधिकारी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये बोलावून पोलिसांसमोर चर्चा घडवून आणल्या. विद्यार्थ्यांना न्याय देण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना डॉ. धेंडे यांनी बार्टीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी शासनाने नेमलेल्या समिती पुढे हा विषय ठेवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन बार्टीच्या अधिकाऱ्यांनी दिले. तसेच संशोधक विद्यार्थ्यांचे प्रबंध (थीसिस) बार्टी कडून स्वीकारले जातील, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांना आपले आंदोलन तात्पुरते स्थगित करून उपोषण मागे घेण्याची विनंती डॉ. धेंडे यांनी केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देखील हे आंदोलन स्थगित केले आहे.
या वेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये रंजना कांबळे, सारिका गोंडाणे, मानसी वानखेडे, कविता गाडगे, अश्विनी कांबळे, प्रदीप त्रिभुवन, ईश्वर अडसूळ आदीसह विद्यार्थी व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच बार्टीचे महासंचालक सुनील वारे, डॉ. अंकुश गायकवाड, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक सातपुते आदीसह कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
—————-
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली दखल* –
या आंदोलन दरम्यान डॉ. धेंडे यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना संपर्क करून संबंधित परिस्थितीबाबत माहिती दिली. मंत्री आठवले यांनी देखील फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती डॉ. धेंडे यांनी दिली.
——————–
पीएचडी धारकांना बार्टी मार्फत मिळणारी फेलोशीप रखडली आहे. शासनाने फेलोशीप बाबत समान धोरण आखण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यांचा अहवाल घेऊन अर्थ मंत्र्यांकडे पाठवून फेलोशिपचे धोरण ठरविण्यात येणार आहे. मात्र याची कार्यवाही धिम्या गतीने सुरू असल्याने विद्यार्थी संतप्त आहेत. फेलोशीप मिळावी यासाठी मी स्वतः देखील शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. शासनाने या प्रकरणी स्थापन केलेल्या समितीची पुढील आठवड्यात मुंबईत भेट घेऊन प्रश्न मार्गी लावणार आहे.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
———————————–