41 टक्के पगारवाढ तरीही एसटी संपाचा तिढा कायम
: विलीनीकरणाच्या मुद्द्यावर कर्मचारी ठाम
मुंबई : राज्य सरकारने बुधवारी वेतनवाढीची घोषणा केल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला असून विलीनीकरणाच्या मागणीवर आंदोलक ठाम आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याची घोषणा करतानाच दर महिन्याला दहा तारखेपर्यंत पगार देण्याची हमी बुधवारी परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. एसटीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वेतनवाढ आहे. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहनही परब यांनी केली.
परिवहनमंत्रीअनिल परब यांनी सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेत वेतनवाढीची घोषणा केली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. परब म्हणाले की, विलीनीकरण करावे असे कामगारांचे म्हणणे होते. समितीसमोर विषय असल्याने निर्णय घेता येत नसल्याचे आमचे म्हणणे होते. संप लांबतच चालला होता. समितीचा अहवाल येण्यास उशीर असल्याने तोपर्यंत संप चालू ठेवणे योग्य ठरणार नाही. सरकारतर्फे प्रस्ताव ठेवल्याचे परब यांनी स्पष्ट केले.
समितीने विलीनीकरणाचा निर्णय घेतल्यास तो सरकारला मान्य असेल असे सांगून परब म्हणाले की, सरकारने कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना घरभाडे आणि महागाई भत्ता राज्य सरकरप्रमाणे दिला जातो. पण मुद्दा मूळ पगाराचा होता. यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
COMMENTS