लवकरच महापालिकेची मुख्यसभा होणार आॅफलाइन!
: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर विकास विभागाला दिले आदेश
: सर्वपक्षीय नगरसेवकांना दिलासा
पुणे: शहरात कोरोनाने थैमान घातल्यामुळे निर्बंध कडक केले होते. त्याचा परिणाम महापालिकेच्या मुख्य सभेवर झाला होता. मुख्य सभा ऑनलाइनच घेतली जात आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरी अद्याप देखील महापालिकेची मुख्यसभा आॅनलाइन होत आहे. हे निर्बंध हटविण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास खात्याचे सचिव महेश पाठक यांना दिले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात याबाबत आदेश निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
– राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली तक्रार
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची विश्रामगृह येथे बैठक घेतली. त्यामध्ये शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर चुकीचे काम होत असताना तुम्ही विरोध का करत नाहीत, असा प्रश्न पवार यांनी केला. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची मुख्यसभा ही आॅनलाइन होत आहे, नगरसेवकांना बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात, अशी तक्रारींचा सूर पदाधिकाऱ्यांनी लावला. त्याच वेळी पवार यांनी थेट नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक यांना फोन करून त्यांना याबद्दल चौकशी केली. त्यावेळी पाठक यांनी हा प्रस्ताव तयार असून, तो येत्या आठवड्यात याबाबत आदेश काढले जातील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एका आठवड्यात हा आदेश निघाल्यास आगामी मुख्यसभेत विषय आक्रमकपणे मांडला येतील, असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
– सरकार ला वारंवार पत्रव्यवहार
दरम्यान महापालिकेची मुख्य सभा ऑफलाईन करण्याबाबत सत्ताधारी भाजपने देखील सरकारला वारंवार पत्रव्यवहार केला होता. महापौर मुरलीधर मोहोळ आणि सभागृह नेता गणेश बीडकर यांनी सरकारला पत्रे पाठवली आहेत. याचा प्रतिसाद म्हणून सभा ऑफलाईन घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र दुसऱ्या दिवशी लगेच सरकारने सभा ऑनलाईन घेण्यास सांगितले. त्यामुळे सत्त्ताधाऱ्यांसोबत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची देखील कोंडी झाली होती. मात्र आता अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
COMMENTS