महिला सुरक्षिततेवर महापौरांनी बोलावली बैठक
: शहरात अत्याचाराच्या घटना पाहता सुरक्षितता आवश्यक
: पोलीस अधिकारी आणि महापालिका अधिकारी राहतील उपस्थित
पुणे: शहरात मागील दोन आठवड्यात महिला अत्याचारात वाढ झालेली दिसून आली. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. त्यामुळे महिला सुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे. त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महिला सुरक्षितता या विषयावर उद्या बैठक बोलावली आहे. बैठकीमध्ये महापालिका आणि पोलीस अधिकारी उपस्थित राहतील.
: सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सद्यस्थितीमध्ये नोकरी, व्यवसायात महिला वर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र नोकरी, व्यवसायानिमित्त महिलांना रात्री अपरात्री प्रवास करावा लागत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. शिवाय पुणे शहरात अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. मागील 15 दिवसात पुणे आणि पिंपरी परिसरात असे बरेच प्रकार झालेले दिसून आले. याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गंभीरपणे पाऊल उचलायचे ठरवले आहे. त्यामुळेच महिलांची सुरक्षितता या विषयाबाबत गुरूवार दु. १२.०० वा. महापौर कार्यालय, पुणे महानगरपालिका येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त (गुन्हे ),तसेच पुणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
COMMENTS