महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकणारच!
: राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा निर्धार
: शहर कार्यकारिणीची पहिली बैठक
पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यकारिणीतील सर्व शिलेदार, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण जोमाने काम करू. प्रभाग तिथे शाखा, वॉर्ड तिथे शाखा उभारून पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोचवू आणि येत्या निवडणुकीत पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवू,’ असा निर्धार शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला. पक्षाच्या नवनियुक्त शहर कार्यकारिणीची पहिली बैठक गुरुवारी पार पडली. बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदारीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी जगताप बोलत होते.
: पक्षासाठी कान आणि डोळे बनून कार्यरत राहणार आहोत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, खासदार सौ. सुप्रिया सुळे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त शहर कार्यकारिणीची पहिली बैठक गुरुवारी कृष्णसुंदर लॉन्स येथे पार पडली. कमल ढोले, कुमार गोसावी, दीपाली धुमाळ, राजलक्ष्मी भोसले, शांतिलाल सूरतवाला, रवींद्र माळवदकर, सदानंद शेट्टी, बाळासाहेब बोडके, शंकरराव केमसे, दीपक मानकर, विशाल तांबे, सचिन दोडके, निलेश निकम, अंनिस सुंडके, भगवान साळुंके आदी मान्यवरांसह शहरातील सर्व विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते नव्या कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र सुपूर्त करण्यात आले. तसेच, पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपकडून ॲमेनिटी स्पेसच्या विक्रीचा जो घाट घातला जात आहे, त्यास पक्षाचा विरोध असल्याचा ठराव पक्षाचे नवनियुक्त प्रवक्ते विशाल तांबे यांनी मांडला. त्यास नगरसेवक सचिन दोडके यांनी अनुमोदन दिले. सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा ठराव मंजूर करण्यात आला.
या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यकारिणीला संबोधित केले. ‘पुणे हे पवार साहेब, अजितदादा पवार, सुप्रियाताई यांचे शहर आहे. आज पुणे शहर हे देशातील सर्वांत मोठे दुसऱ्या क्रमांकाचे शहर बनले आहे आणि आपण सर्वजण या मोठ्या शहरात आपल्या पक्षासाठी कार्यरत राहणार आहोत. आपण कार्यकारिणीतील सर्व २८३ जण जनता आणि पक्ष यातील दुवा आहोत. त्यामुळे, आपल्यावर पक्षाची खूप मोठी जबाबदारी आहे. काय घडले आहे याचा मागोवा घेणे आणि काय घडणार आहे, याची माहिती घेण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. जनतेचे प्रश्न, धोरणे, चर्चा, संदेश वरिष्ठांपर्यंत पोचविण्याचे कार्यकारिणीचे काम आहे. आपण पक्षासाठी कान आणि डोळे बनून कार्यरत राहणार आहोत. आपण पक्षासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहिलो, तर महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीत महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही,’ असा विश्वास प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.
‘आपण राजकारणात, समाजकारणात वावरत असताना विविध शिबिरांचे, कार्यक्रमांचे आयोजन, जनतेसाठी आंदोलन हे करावेच लागणार आहेत. परंतु, ही कार्यकारिणी केवळ तेवढ्यापुरतीच मर्यादित राहणार नाही. आपल्याला त्यापलीकडे जाऊन काम करायचे आहे. त्यासाठी आपल्याला वेळोवेळी वरिष्ठांचे मार्गदर्शन असणारच आहे. कार्यकारिणीत मांडले जाणारे मुद्दे आणि मते तितक्याच गांभीर्याने घेतली जातील. सर्व सूचनांचे नक्कीच स्वागत केले जाईल. त्यामुळे, जनतेच्या हिताच्या कोणत्याही सूचना करा, सोशल मीडियावर सक्रीय राहा,’ असे आवाहन प्रशांत जगताप यांनी केले.
COMMENTS