मनपा शाळेत शिकलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन वाढ द्यावी
: नगरसेविका अर्चना पाटील यांचा स्थायी समिती समोर प्रस्ताव
पुणे. पुणे महानगरपालिकेमधील ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे शालेय शिक्षण पुणे महानगरपालिकेच्याच शाळेमध्ये केलेले आहे, अशा अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन म्हणून एक वेतन वाढ देण्यात यावी. अशी मागणी भाजपची नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली आहे. तसा एक प्रस्ताव त्यांनी स्थायी समिती समोर ठेवला आहे. त्यावर समितीच्या आगामी बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
पटसंख्या वाढण्यास होईल मदत – पाटील
शहरात महापालिकेच्या प्राथमिक तसेच माध्यमिक विभागाच्या शाळा आहेत. यामध्ये 1 लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून या शाळांमधील पटसंख्या घटत चालली आहे. महापालिका प्रशासनाकडून त्याबाबत वेगवेगळ्या उपाय योजना राबवण्यात येतात. याबाबत नगरसेवक देखील महापालिका प्रशासनाला मदत करत असतात. याला अनुसरून भाजप नागसेविका व स्थायी समिती सदस्य अर्चना पाटील यांनी स्थायी समिती समोर एक प्रस्ताव ठेवला आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेमधील ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे शालेय शिक्षण पुणे महानगरपालिकेच्याच शाळेमध्ये केलेले आहे, अशा अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन म्हणून एक वेतन वाढ देण्यात यावी. जेणेकरुन येणा-या पुढील काळामध्ये पुणे शहरामधील नागरिक हे त्यांच्या पाल्यांचे प्रवेश हे पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये घेतील. नुकतेच पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमधील विद्यार्थी देखील पुढील काळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतील व पुणे मनपाच्या शाळेमधील पट संख्या वाढण्यास मदत होईल. असे पाटील यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे.
–
COMMENTS