विरोधकांची ५० वर्षे विरुद्ध भाजपाच्या माध्यमातून झालेल्या पुण्यातील विकासकामांचा हिशोब जनतेसमोर मांडणार
:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
:कोथरूड मधील आशिष गार्डन- सागर कॉलनी- शांतीबन चौक डीपी रोडचे लोकार्पण
पुणे: महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून पुणे मेट्रो, चांदनी चौकातील सहापदरी रोड, नदी सुधार असे अनेक विकासाचे प्रकल्प(Devlopment Projects) उभारले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात ५० विरुद्ध पाच वर्षांच्या कामांचा हिशेब जनतेसमोर मांडणार असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष . चंद्रकांतदादा पाटील(Chandrakant Patil) यांनी केले. गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित कोथरूड मधील आशिष गार्डन- सागर कॉलनी- शांतीबन चौक डीपी रोड पाटील यांच्या पुढाकारातून मार्गी लागला. या रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर MLA भीमराव तापकीर, नगरसेवक किरण दगडे-पाटील, दिलीप वेडे-पाटील, नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक, अल्पना वर्पे, अॅड. वासंती जाधव, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, सरचिटणीस दिनेश माथवड, स्विकृत सदस्य बाळासाहेब टेमकर, गणेश वर्पे, प्रभाग क्रमांक १० (कोथरुड)चे अध्यक्ष कैलास मोहोळ, (खडकवासला) सागर कडू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, १९८२ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत असताना, अनेकदा पुण्यात येण्याचा योग आला. तेव्हापासून पुणे शहराची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्यामुळे आशियातील सर्वात जलदगतीने वाढणारं शहर म्हणून पुण्याची ख्याती झाली. वाढत्या लोकसंख्येनुसार रस्ते, पाणीपुरवठा वाहिन्या, ड्रेनेज लाईन आदी नागरी सुविधा महापालिकेच्या माध्यमातून निर्माण करण्याची गरज असते. गेल्या पाच वर्षांत महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून हे विषय मार्गी लावण्यासोबतच पुण्याच्या विकासाच्या अनुषंगाने मेट्रो, चांदनी चौकातील सहापदरी रोड, नदी सुधार प्रकल्प यांसारखे अनेक प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात विरोधकांची ५० वर्षे विरुद्ध भाजपाच्या माध्यमातून झालेल्या पुण्यातील विकासकामांचा हिशोब जनतेसमोर मांडणार आहोत.
ते पुढे म्हणाले की, २० वर्षांपूर्वी पुणे महापालिकेचे बजेट १३०० कोटी होतं. पण केंद्रातील भाजपा सरकारने मेट्रोच्या माध्यमातून ११ हजार कोटींचा प्रकल्प पुणेकरांसाठी आणला. आता त्याचे उद्घाटन, पाहाणी काही नेते करत आहेत. पण पुण्यातील नागरिकांना मेट्रो कुणामुळे आली हे माहित आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात विविध ठिकाणी एक लाख ७६ हजार कोटींचे मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत. पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर वाहतूककोंडीची समस्या संपेल. त्यामुळे पुणेकरांच्या आशीर्वादाने महापालिकेत पुन्हा सत्ता आल्यानंतर, घर ते मेट्रो स्टेशनप्रवासासाठी मोफत ई-बस किंवा ई-रिक्षाची व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. चांदनी चौकातील सहापदरी रस्त्याचे कामही पूर्ण झाल्यानंतर पुण्याच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. असे एक ना अनेक प्रकल्प भाजपा सरकारच्या काळात पूर्ण होत आहेत. त्यामुळे शहराच्या विकासासाठी भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. सागर कॉलनीतील रस्त्याचा प्रश्न ही संवादाच्या आणि सततच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लावता आला.
भीमराव आण्णा तापकीर म्हणाले की, चंद्रकांतदादा पाटील हे कोथरुडचे आमदार झाल्यानंतर अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने कोथरुडकरांना वेळ देऊ शकतील का? पण प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळताना, त्यांनी मतदारसंघावर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ दिला नाही. डीपी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावतानाही माननीय दादांनी सर्वांना सोबत घेऊन कुणावरही अन्याय होऊ दिला नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाही हायब्रीड अँन्यूटीच्या माध्यमातून जे रस्ते उभारले गेले, त्यामुळे खडकवासला मतदारसंघातील सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.
यावेळी नगरसेवक किरण दगडे-पाटील दिलीप वेडे-पाटील नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक अल्पना वर्पे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना डीपी रस्त्याचे काम पूर्णत्वास येण्यापर्यंतचा इतिहास मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव मुरकुटे यांनी केले. तर सागर कडू यांनी आभार मानले.
COMMENTS