का जिंकणे गरजेचे आहे अफगाणिस्तान?
: अफगाणिस्तानच्या विजयासाठी भारतीयांचे देव पाण्यात!
दुबई : भारतीय संघानं (Team India) स्कॉटलंडविरोधात उत्तम खेळ खेळत टी २० विश्वचषत स्पर्धेच्या सेमीफायनल (Semifinal) मध्ये प्रवेशाची आपली आशा कायम ठेवली आहे. भारतानं स्कॉटलंडच्या गोलदांजांचा धुव्वा उडवत आपला नेट रनरेट मजबूत केला आहे. भारतानं नेट रनरेटच्या बाबतीत पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या संघांना मागे सोजलं आहे. परंतु सध्या भारताच्या सेमीफायनलमधील प्रवेशावर एकच टांगती तलवार आहे ती म्हणजे न्यूझीलंड विरूद्ध अफगाणिस्तान या सामन्याची.
भारताला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर अफगाणिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव करणं आवश्यक आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचा संघानं न्यूझीलंडचा पराभव करावा अशी प्रार्थना भारतातून केली जात आहे. सध्या भारताचा नेट रनरेट हा +1.619 इतका आहे.
उद्या होणार सामना
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना ७ नोव्हेंबर रोजी अबूधाबी येथे खेळवला जाणार आहे. आतापासूनच ही मॅट ट्विटरवर ट्रेंड (#AfgvsNZ) होताना दिसत आहे. ट्विटरवर एका युझरनं लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी गायलेलं ‘एक तू ही भरोसा, एक तू ही सहारा’ या गाण्यासह ‘Nov 7’ असं लिहित हात जोडण्याचा सिम्बॉलही लावला आहे.
तर एका युझरनं अफगाणिस्तान आमच्यासाठी अखेरची आशा आहे असं लिहिलं आहे. यासोबत त्यानं एक फोटो शेअर करत 1.3 Billion लोक अफगाणिस्तानसोबत असल्याचं म्हटलं आहे. तर काही लोकांनी फिंगर क्रॉस्ड्चं सिंबल बनवलं आहे.
यापूर्वी ४ नोव्हेंबर रोजी भारताचा स्टार फिरकीपटून आर. अश्विननं ही इच्छा व्यक्त केली होती की भारताच्या फिजिओंनी अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू मुजीब उर रहमानची मदत करावी. त्यानंतर अश्विनच्या या ट्वीटला रिप्लाय देत रशिद खाननं तुम्ही चिंता करू नका आमचे फिजिओ त्याची चांगली काळजी घेत आहेत, असं म्हटलं.
पहिल्या दोन सामन्यांनंतर भारताचं विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आल्याचं म्हटलं जात होतं. मात्र अफगाणिस्तान आणि स्कॉटलँडला भारतानं अक्षरश: लोळवलं. त्यामुळे भारताचा समावेश असलेल्या ब गटात आता चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. गटातून दोन संघ उपांत्य फेरीत जातील. पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित आहे. तर दुसऱ्या जागेसाठी तीन संघ शर्यतीत आहे.
ब गटात आता तीन सामने शिल्लक आहेत. पाकिस्तानचा संघ स्कॉटलंडशी भिडेल. पण पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला असल्यानं आणि स्कॉटलंडचं आव्हान संपुष्टात आल्यानं या सामन्याला फारसं महत्त्व नाही. ७ नोव्हेंबरला अफगाणिस्तान वि. न्यूझीलँड आणि ८ नोव्हेंबरला भारत वि. नामिबिया हे सामने होणार आहेत.
न्यूझीलंडनं नामिबियाला ५२ धावांनी पराभूत केलं. त्यामुळे ६ गुणांसह न्यूझीलंड आता ब गटात दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंड सामना जिंकला असला, तरीही त्यांना मोठा विजय नोंदवता आला नाही. नामिबियानं १६ षटकांपर्यंत टिच्चून गोलंदाजी केली. त्यामुळे न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
नेट रनरेटच्या बाबतीत अफगाणिस्तानला मागे टाकण्यासाठी न्यूझीलंडनं नामिबियाला ९४ किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येवर रोखणं गरजेचं होतं. मात्र नामिबियानं १११ धावा केल्या. न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १६३ धावा उभारल्या. नामिबियाच्या शानदार गोलंदाजीमुळे एक वेळ किवी संघ ४ बाद ८७ अशा अडचणीत होता. मात्र फिलिप्स आणि निशामनं शेवटच्या ४ षटकांत ६० हून अधिक धावा काढल्या.
न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान सामना ७ नोव्हेंबरला होईल. तर भारत वि. नामिबिया सामना ८ नोव्हेंबरला होईल. अफगाणिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव केल्यास भारताला लॉटरी लागेल. या स्थितीत अफगाणिस्तान, न्यूझीलंडचे प्रत्येकी ६ गुण होतील. भारतानं नामिबियाला मोठ्या फरकानं नमवल्यास भारताचेदेखील ६ गुण होतील. पण नेट रनरेट जास्त असल्यानं भारत उपांत्य फेरीत जाईल.
COMMENTS