पुण्यातील शिवसैनिकांना काय म्हणाले उद्धव ठाकरे?
पुण्यातील शिवसैनिकांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी भारतीय जनता पार्टीला शिवसेना संपवायची आहे, त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी मला तुमची ताकद हवी आहे, हा प्रवास विनातिकीट करायचा आहे. सोबत रहा अशा भावनिक शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी पुण्यातील शिवसैनिकांना साद घातली.
मातोश्री या निवासस्थानी ठाकरे यांनी पुण्यातील शिवसैनिकांची भेट घेतली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्यासह शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महापालिकेतील माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक विशाल धनवडे व अन्य माजी नगरसेवक, उपशहरप्रमुख रुपेश पवार, विजय देशमूख, अनंत गोयल तसेच बरेच शिवसैनिक उपस्थित होते.
ठाकरे यांनी त्यांना सांगितले की, भाजपाने शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठीच हे सगळे सुरू आहे. यापुढचा प्रवास विनातिकीट आहे. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, मात्र ताकदीने माझ्यासमोर उभे रहा, आपण शिवसेना पुन्हा उभी करू, त्यांचा डाव हाणून पाडू. फुटून बाहेर पडलेल्या आमदारांनी हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा व पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे आव्हानही त्यांनी दिले.