Wadia College Pune | वाडिया महाविद्यालयाला ९१ वर्षे | त्यानिमित्त माजी विद्यार्थी मेळावा
Wadia College Pune | पुणे – येथील नवरोजी वाडिया महाविद्यालयाच्या (Nowrosjee Wadia College) स्थापनेला ९१ वर्षे झाली. त्यानिमित्ताने महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या महामेळावा नुकताच संपन्न झाला.
वाडिया महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जगभरात सर्वदूर कार्यरत असून, ते या महामेळाव्याला आवर्जून उपस्थित होते. महाविद्यालयाच्या टाटा असेम्ब्ली हॉलमध्ये महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
अमेरिका, इंग्लंड, युएइ, मॉरिशस, श्रीलंका तसेच भारतातील विविध राज्यांमध्ये स्थायिक झालेले वाडिया महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी, सुप्रसिद्ध संगीतकार इनोक डॅनियल होते. मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी प्राध्यापक अशोक चांडक, प्राध्यापक सचिन सानप, प्राचार्य वसंत चाबुकस्वार, प्राचार्य वृषाली रणधीर, विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ.पुरुषोत्तम पटेल, ॲड.राहुल दिंडोकर, रमेश अय्यर आदी माजी विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित होते. या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
मेळाव्यामध्ये राष्ट्रीय, सामाजिक पातळीवर तसेच विविध क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या माजी विद्यार्थ्यांना ‘वाडीयन प्राइड’ अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध विधी तज्ज्ञ ॲड.हर्षद निंबाळकर, महावीर चक्र विजेते व सामाजिक कार्यकर्ते कर्नल संभाजी पाटील, प्रकाशन क्षेत्रात विशेष योगदान असलेले दिनकर शिलेदार, पर्यावरण तज्ज्ञ व वनराईचे प्रणेते रघुनाथ ढोले, सामाजिक कार्यकर्ते अरविंद वाळवेकर, शिक्षण क्षेत्रातील विशेष योगदानासाठी अबिदा इनामदार आणि आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते श्याम सहानी आदींचा त्यात समावेश होता.
विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ.पुरुषोत्तम पटेल यांनी माजी विद्यार्थ्यांचे संघटन व मेळावे याचे महत्त्व विशद केले तसेच संघटनेचा अहवाल सादर केला. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी चे ट्रस्टी प्राध्यापक सचिन सानप यांनी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या भविष्यकाळातील योजनेची माहिती दिली. प्राचार्य वसंत चाबुकस्वार यांनी महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले विविध कोर्सेस तसेच विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील योगदान इत्यादीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ.समीना बॉक्स वाला तसेच श्रीराम शिंदे यांनी केले.