Voting Percentage of Maharashtra Increased | महाराष्ट्राच्या मतदान टक्केवारीत वाढ!
Voting Percentage of Maharashtra – (The Karbhari News Service) – केंद्रिय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीसाठी सर्व राज्यांना मतदानाचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत अधिक प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच मतदानाची टक्केवारी कमी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले होते. महाराष्ट्रातील मतदान आकडेवारीत ही दोन्ही उद्दिष्ट साध्य झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य, यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. (Loksabha Election 2024)
महाराष्ट्रात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ ही पाच टप्प्यात घेण्यात आली. त्यामध्ये एकूण ६१.३३ इतके टक्के मतदान झाले.यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ही ३ कोटी ६ लाख ५६ हजार ६११ इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या २ कोटी ६३ लाख ४८ हजार ७१७ इतकी आहे. तर इतर मतदार यामध्ये १ हजार ४५० जणांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत एकूण मतदार ५ कोटी ३८ लाख ३८ हजार ३८९ मतदारांनी मतदान केले होते त्याची टक्केवारी ६०.७१ इतकी होती.
प्रत्येक मतदान केंद्रासाठी केंद्राध्यक्षाकडील फॉर्म – १७ – सी नुसार झालेल्या मतदानाची माहिती त्या केंद्रावरील मतदान प्रतिनिधींना पुरवली जाते व अंतिमतः मतमोजणीच्या वेळेस त्याच आकडेवारीशी मतदार यंत्रावरील मतदानाचे आकडे पडताळून पाहिले जातात.
0000