Vijaystambh Sohala | पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
| विजयस्तंभ अभिवादन सोहळा यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे
Perane Fata Sohala – (The Karbhari News Service) – पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा तसेच येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी सर्व विभागांनी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. (Pune News)
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी आदी उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले, येत्या १ जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन सोहळ्या येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेता त्यादृष्टीने सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करावे. वाहतूक व्यवस्था, वाहनतळाचा आराखडा बारकाईने तयार करावा, त्यासाठीच्या जागा निश्चित कराव्यात. स्वच्छतेसाठी पथकांची नियुक्ती आणि स्वच्छतागृहांसाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची सुविधा करावी. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची संख्याही विचारात घ्यावी.
पोलीस विभागाने वाहतूकीचे नियोजन करण्यासह कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन करावे. हवेली व पुणे शहर उपविभागीय अधिकारी, पोलीस विभाग व पीएमपीएमएलने ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीसाठी पुरेशा बसेसची संख्या निश्चित करावी. पीएमपीएमएलने वाहनात इंधन भरण्याचीही पुरेशी व्यवस्था करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी.
गतवर्षीच्या तुलनेत वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अनुयायांची संख्या लक्षात घेऊन रुग्णवाहिकांची संख्या वाढवावी. संपूर्ण सोहळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी परिसरात नियंत्रण कक्ष स्थापन करावे. सर्व संबंधित विभागाने सोहळ्याच्या अनुषंगाने जागेची पाहणी करावी. सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागाने समन्वयाने कामे करावीत, अशाही सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या.
अपर पोलीस आयुक्त श्री. शर्मा म्हणाले, येणाऱ्या अनुयायांची संख्या तसेच गर्दीचा विचार करुन पुस्तक स्टॉलची संख्या निश्चित करावी. विजयस्तंभजवळ असणाऱ्या मान्यवरांची यादी बार्टीने तयार करुन पोलीस विभागाकडे पाठवावी, असेही श्री. शर्मा म्हणाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील म्हणाले, अनुयायांची संख्या लक्षात घेता शौचालयाची संख्या आणि त्यांची स्वच्छतेबाबत नियोजन करावे. जिल्हा परिषदेच्या अधिनस्त येणारी कामे वेळेत पूर्ण करण्यात येईल, असेही श्री. पाटील म्हणाले.
यावेळी विजयस्तंभ परिसराचे सुशोभिकरण, प्रकाशव्यवस्था, स्टॉल, मंडप उभारणी, वाहनतळ, वाहतूक आराखडा, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, रस्त्यांची दुरुस्ती, तात्पुरते शौचालय उभारणी, स्वच्छतेसाठी घंटागाड्या, आपत्तकालीन प्रसंगी अग्नीशमन वाहनांची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, हिरकणी कक्ष, आपत्ती व्यवस्थापन आदींबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, संदीप डोईफोडे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे शहरच्या उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे, हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए अग्नीशमन विभाग, एनडीआरएफ, जिल्हा परिषद, पोलीस विभाग, परिवहन, पीएमपीएमएल, आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
COMMENTS