विद्यापीठ सिनेट निवडणूक | महाविकास आघाडी फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेची? | काँग्रेसचा स्वतंत्र पुरस्कृत पॅनेल
पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचे चित्र तयार होत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे यात उमेदवार आहेत. हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस मात्र ही आघाडी मानायला तयार नाही. काँग्रेस ने या निवडणुकीत एकही उमेदवार उभा केलेला नसला तरी मात्र काँग्रेस ने एक पुरस्कृत पॅनल उभा केला आहे. दरम्यान काँग्रेसच्या या भूमिकेवरून राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त करत आघाडी नसल्याची अधिकृत भूमिका जाहीर करण्याची मागणी केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरून राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजप पुरस्कृत पॅनेलचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस ने यात पुरते बळ लावण्याचे मनावर घेतले आहे. राष्ट्रवादी नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतेच सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल च्या कचेरीचा शुभारंभ केला. राष्ट्रवादी व शिवसेनेने दहा ते दहा ठिकाणी तरुण युवक व उच्च विद्याविभूषित उमेदवारांना संधी देण्यात आली असून पॅनलच्या जाहीरनामाचे प्रकाशन देखील संपन्न झाले.
या निवडणुकीत काँग्रेस ने मात्र वेगळा सूर आळवला आहे. काँग्रेस ने या निवडणुकीत एकही उमेदवार उभा केलेला नसला तरी मात्र काँग्रेस ने एक पुरस्कृत पॅनल उभा केला आहे. काँग्रेसने ‘छत्रपती शाहू महाराज परिवर्तन’ पॅनेलला जाहीर पाठींबा दिला आहे. पुणे शहर विद्यार्थी काँग्रेस – एन. एस. यू. आयने ‘छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेलला पत्रा द्वारे पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेस ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढत नाही. तसा उल्लेख देखील काँग्रेस ने कधी केला नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना मात्र पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवत असल्याचे जाहीर करत आहेत. काँग्रेस मात्र हे मानायला तयार नाही. यावरून आता आघाडीत बिघाडी मानली जात आहे. तर काँग्रेसच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी मात्र चांगलीच नाराज झाली आहे. राष्ट्रवादीने आव्हान दिले आहे कि आघाडीबाबत काँग्रेसने आपली अधिकृत भूमिका जाहीर करावी.
—
सिनेट च्या निवडणुकीत आमचा काँग्रेस पुरस्कृत पॅनेल आहे. याबाबत पुणे शहर विद्यार्थी काँग्रेस ने देखील आपली अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आमचा कुठलाही नेता उपस्थित नव्हता.
– अरविंद शिंदे, प्र. शहर अध्यक्ष, काँग्रेस
—
सिनेट निवडणुकीत उमेदवार देताना आम्ही काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याशी सल्लामसलत करूनच उमेदवार दिले आहेत. आम्ही ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढतो आहोत. सगळ्या पातळ्यांवर राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस असे आम्ही आघाडी म्हणूनच एकत्र आहोत. पण काँग्रेस ला तसे वाटत नसेल तर काँग्रेस चे शहर अध्यक्ष आणि विद्यार्थी काँग्रेस ला माझे आव्हान आहे कि त्यांनी आघाडी नसल्याची अधिकृत भूमिका जाहीर करावी.
– प्रशांत जगताप, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस