UDPCR | Pune News | 20 टक्के झोपडपट्टी टीडीआर वापरण्याची केलेली सक्ती रद्द करा | माजी नगरसेवकांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
UDPCR | Pune News | युडीसीपीआर मध्ये पुण्यासाठी 20 टक्के झोपडपट्टी टीडीआर वापरण्याची केलेली सक्ती रद्द करणेची मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे, संजय बालगुडे, शिवा मंत्री यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. (Pune News)
माजी नगरसेवक यांच्या निवेदनानुसार पुण्यामध्ये कुठला टीडीआर कधी वापरायचा याबाबत UDCPR मध्ये काही तरतूद नव्हती. काही मान्यवर नगरसेवक व्यावसायिक नगरसेवक यांच्या आग्रहाने पुण्यामध्ये झोपडपट्टी साठी असलेला वीस टक्के टीडीआर वापरण्याची परवानगी देण्याची तरतूद आयुक्तांना दिली. पुण्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाचा एकही प्रकल्प चालू नाही. झोपडपट्टी पुनर्वसनाचे जे प्रकल्प आहेत ते जुने वाडे चाळी यांच्या पुनर्वसनाचे प्रकल्प आहेत. त्यांना झोपडपट्टी सदृश्य असे गोंडस नाव दिले आहे.
हे संपूर्ण व्यवहार बेकायदेशीर असून यात महानगरपालिकेचे नुकसान होत आहे. त्यामुळे ज्या उदात्त हेतूने झोपडपट्टी पुनर्वसनाचा टीडीआर वापरण्याचे आदेश दिले त्याचा फायदा या मान्यवरांनी स्वतः झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली खाजगी वाडे आणि चाळी यांचे पुनर्वसन करून निर्माण झालेला टीडीआर सक्तीचा करण्यास भाग पाडले. यात महानगरपालिकेचे नुकसान आहे बांधकाम व्यावसायिकाचे नुकसान आहे आणि पर्यायाने युजर म्हणून पुणेकर नागरिकांचे देखील नुकसान आहे. साधारणतः 180 पट जास्त भावाने हा झोपडपट्टीचा टीडीआर सर्वप्रथम घ्यावा लागतो तो घेतल्याशिवाय बाकी टीडीआर घेता येत नाही. यात अधिकाऱ्यांचे देखील साटे लोटे असू शकते.
यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना जास्त भावात घरे विकत घ्यावी लागतात.
आम्ही जे सांगितले त्याची संपूर्ण शहानिशा करून मग निर्णय करा पण हा निर्णय नक्की करा आणि पुण्यासाठी झोपडपट्टीचा टीडीआर वापरल्यानंतरच बाकीचा टीडीआर वापरता येईल अशा प्रकारची तरतूद तातडीने रद्द करावी. अशी मागणी निवेदानाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.