उद्धव ठाकरेंनी शब्द जपून वापरावेत! |अन्यथा जनताच धडा शिकवेल
|चंद्रकांतदादा पाटील यांचा सल्ला
राज्यातील सत्ता हातून गेल्यापासून उद्धव ठाकरे हताश झाले आहेत. त्यामुळे ते आता संजय राऊतांची भाषा बोलू लागले आहेत. मात्र, उद्धवजी आपल्या तोंडून हे शब्द शोभत नाहीत. आपण शब्द जपून वापरावेत, असा सल्ला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. तसेच, आमच्या नेत्यांवर टीका कराल, तर जशास तसे उत्तर मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरील उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक टीकेवर बोलताना मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सध्या राज्याच्या राजकारणात टीका करण्यासाठी काही नेते अगदी खालच्या पातळीवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे हे संयमी नेते होते. मात्र, सत्ता हातून गेल्यापासून ते हताश झाले आहेत. त्यामुळे सध्या उद्धवजी संजय राऊतांची भाषा बोलत आहेत. त्यांनी सांभाळून बोलावे. अन्यथा जनताच त्यांना योग्य धडा शिकवेल. तसेच भाजपाच्या नेत्यांवर टीका कराल, तर त्याला जशास तसे उत्तर मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.