विद्यापीठ रस्त्यावर होणार तीन भुयारी मार्ग! महापालिका आयुक्तांची माहिती
पुणे : शहरातील वाहतूक कोंडी (Traffic) फोडण्यासाठी राज्यशासनाच्या निधीतून शहरात सुमारे 21 ठिकाणी उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ते सिमला ऑफिस चौका पर्यंत तीन भुयारी मार्ग (Underground road) प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यात विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक तसेच मुख्य विद्यापीठ रस्त्यावरून महापालिका आयुक्तांच्या बंगल्याकडे वळताना हरेकृष्ण मंदीर चौकात भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. या मार्गांचा डीपीआर तयार करणे तसेच त्याची फिजिबिलीटी तपासण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार असून या निविदा काढण्यासाठी मंगळवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी मान्यता दिली आहे.
या शिवाय, संगमवाडी रस्त्यावर शहदलबाबा चौक येथे उड्डाणपूल तर सिंहगड रस्त्यावर नवशा मारूती मंदीराच्या मागील बाजूने मुठा नदीवर डीपी रस्त्याला जोडणारा पूल बांधण्यात येणार आहे.
मागील महिन्यात महापालिकेच्या गोल्फ क्लब चौकातील उड्डाणपूलाच्या उद्घाटनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्यशासनाकडून सर्वोत्परी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच महापालिकेस सुमारे 2 हजार कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार, महापालिकेने शहरात सुमारे 21 ठिकाणी उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यात, जागा ताब्यात असलेल्या 5 ठिकाणी तातडीनं डीपीआर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे सल्लागार नेमून पुढील दोन महिन्यात हे डीपीआर शासनास पाठविण्याचे पालिकेकडून नियोजन करण्यात आले असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले, तसेच त्यास शासनाने मान्यता दिल्यास पुढील चार महिन्यात या सर्व ठिकाणी कामेही सुरू होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
—————-
विद्यापीठ रस्त्यावर पीएमआरडीएकडून मेट्रो 3 चे काम सुरू आहे. या चौकात औंध कडून सेनापती बापट रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी महापालिकेने भुयारी मार्ग प्रस्तावित केला आहे. त्यास पीएमआरडीएने मान्यताही दिलेली आहे. मात्र, त्यासाठी निधी नव्हता त्यामुळे आता हा मार्ग शासनाकडे पाठविला जाणार आहे या शिवाय, मेट्रोचे काम सुरू असतानाच शिमला ऑफिस चौक आणि आयुक्तांच्या घराकडे ज़ाणाऱ्या वाहनांसाठीही भुयारी मार्ग केला जाणार आहे.