समाविष्ट गावासहित पुण्यात आणखी होणार 125 आरोग्यवर्धिनी केंद्र
| सद्यस्थितीत 53 दवाखान्यात आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु
पुणे | पुणेकरांना नाममात्र दरात आरोग्य सेवा मिळावी, या हेतूने राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने शहरात आरोग्य वर्धिनी केंद्र सुरु केली आहेत. सद्यस्थितीत महापालिकेच्या 53 दवाखान्यात ही केंद्र सुरु आहेत. 2018-19 सालापासून ही सुविधा देण्यात येत आहे. आगामी काळात आणखी 125 केंद्र तयार केली जाणार आहेत. सरकारनेच यासाठी मंजुरी दिली आहे. याबाबतची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव यांनी दिली.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात विविध ठिकाणी दवाखान्यांची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना नाममात्र दरात उपचार केले जातात. नागरिकांना चांगले उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाने अजून एक पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या 53 दवाखान्यात आरोग्य वर्धिनी केंद्र स्थापन केली आहेत. या केंद्रात महापालिका टेलिकन्सल्टेशन सेवा देत आहे. या माध्यमातून विशेष तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेतले जाते. त्याचा उपयोग शहरातील नागरिकांना उपचार देताना होणार आहे. त्याचप्रमाणे या आरोग्यवर्धिनी केंद्रात ओपीडी, गरोदर माता तपासणी, टीबीवरील उपचार, लसीकरण, योगा शिकवणे अशाही सेवा दिल्या जातात. त्याचा फायदा नागरिकांना होताना दिसतो आहे.
सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव यांच्या माहितीनुसार 53 केंद्र 2018 साली स्थापन झाल्यावर 2021-22 साठी अजून 29 केंद्र मंजूर झाले. यातील सगळे केंद्र हे समाविष्ट गावातील आहेत. यासाठी महापालिकेला जिल्हा परिषदेकडून मदत मिळणे अपेक्षित आहे. त्यांनी केलेल्या सहकार्यानुसार आपण 9 केंद्र सुरु करू शकतो. कारण यासाठी महापालिका फक्त जागा उपलब्ध करून देणार आहे. बाकी सर्व सुविधा जिल्हा परिषदेने देणे अपेक्षित आहे. यामध्ये औषधे, फर्निचर आणि स्टाफ चा समावेश आहे. त्यावर महापालिका आरोग्य विभागाचे नियंत्रण असणार आहे. जाधव यांच्या माहितीनुसार एका केंद्रासाठी 1 डॉक्टर, 1 सहायक आणि दोन नर्स अशा स्टाफ ची आवश्यकता आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरु आहे. दरम्यान 2022-23 सालसाठी आणखी 96 केंद्राची मंजुरी आली आहे. त्यानुसार आगामी काळात 125 केंद्र होतील. त्याचा नागरिकांना चांगला फायदा होणार आहे.